संदीप आडनाईक
कोल्हापूर : एरवी खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आणि अवकाशाबद्दल जिज्ञासा असणाऱ्यांनी अवकाशातील अनेक खगोलीय घटना पाहिल्या असतील, परंतु सोमवारी त्यांनी चक्क सहा मिनिटे मानवनिर्मित अवकाशीय वस्तूचे कोल्हापूरच्या अवकाशात दर्शन घेतले. ही अवकाशीय वस्तू दुसरे-तिसरे काही नसून चक्क आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक होते.कोल्हापूरात अनेक खगोलप्रेमींनी सोमवारी हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक प्रत्यक्ष पाहिले. चंद्राच्या अगदी जवळून प्रवास करताना हे अवकाश स्थानक कोल्हापूरच्या अवकाशात पृथ्वीवरुन सरासरी ३५0 किलोमीटर उंचीवर होते. अवकाशातून प्रवास करणाऱ्या एखाद्या विमानाप्रमाणेच चमचम करत ते क्षणार्धात दिसेनासे झाले. या स्थानकाचा वेग इतका प्रचंड होता, की ते काही मिनिटांत चीनच्या सीमारेषेपार गेले. काही परिसरात ढगाळ हवामानामुळे अनेकांना त्याचे दर्शन झाले नाही.खगोल अभ्यासक प्रा. अविराज जत्राटकर यांनी यळगूड, ता. कागल येथून तर त्यांच्या सहकाऱ्यांनी कोल्हापूरातून हा अनुभव घेतला. निवृत्त रेल्वे कर्मचारी शशिकांत शिवाजीराव नाईक यांनी जीवबानाना पार्क येथून तर बांधकाम व्यावसायिक मिलिंद नाईक यांनी कळंबा येथे प्रवासात थांबून हे स्थानक पाहिले.आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) हे जगभरातील सोळा देशांनी एकत्र येऊन अंतराळात बांधले गेलेले संशोधन केंद्र आहे. हे स्थानक पृथ्वीपासून जवळच्या कक्षेत फिरते आणि मानवाला उघड्या डोळ्यांनी दिसते. फुटबॉलच्या मैदानाएवढे आकाराने मोठे असणारे हे स्थानक पृथ्वी भोवती ४०० किलोमिटर उंचीवरून दिवसाला जवळपास १५ फेऱ्या पूर्ण करते.
तासाला २७,७२४ किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालते; म्हणजे ९१ मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण होते. हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३५० कि.मी. उंचीवर आहे. हे स्थानक म्हणजे एक कृत्रिम उपग्रह असून, तो आतापर्यंतच्या कोणत्याही कृत्रिम उपग्रहापेक्षा खूप मोठा आहे.
दि. २४ मे रोजी पहाटे ५ वाजून 0८ मिनिटांनी सहा मिनिटांसाठी तर २५ मे रोजी पहाटे ४ वाजून २0 मिनिटांनी अवघ्या दोन मिनिटांसाठी हे स्थानक दिसू शकेल. अर्थात हे स्थानक क्षितिजाच्या अगदी जवळून जाणार असल्यामुळे फारच कमी कालावधीसाठी दिसणार आहे. हे स्थानक दक्षिण-पश्चिम दिशेतून वर येताना दिसेल. सिंह राशीतला मघा तारा आणि कन्या राशीतला चित्रा तारा यांच्या मध्ये हे स्थानक दिसणार आहे आणि ते शोधायलाही सोपे जाणार आहे.
आॅनलाईन लोकमतच्या वृत्तामुळे हे अवकाश स्थानक मी कोल्हापूरात प्रत्यक्ष पाहू शकलो. उघड्या डोळ्यांनी हे स्थानक पाहण्याचा एक वेगळा अनुभव मी घेतला. पूर्ण तयारी करुन पुन्हा असाच अनुभव घेण्यासाठी मी सज्ज आहे.मिलिंद शशिकांत नाईक,बांधकाम व्यावसायिक, कोल्हापूर