उद्योजकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:24 AM2021-04-15T04:24:53+5:302021-04-15T10:54:33+5:30
CrimeNews Ichlkarjanji Kolhapur : इचलकरंजी येथील उद्योजकास व्यवसायामध्ये फसवणूक करून व सावकारी कर्जाच्या वसुलीस तगादा लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहाजणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची तक्रार सौरभ अमर डोंगरे (वय २७, रा. वर्धमान चौक) यांनी दिली आहे. ही घटना सन २०१३ ते २२ डिसेंबर २०१८ दरम्यान घडली होती.
इचलकरंजी : येथील उद्योजकास व्यवसायामध्ये फसवणूक करून व सावकारी कर्जाच्या वसुलीस तगादा लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहाजणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची तक्रार सौरभ अमर डोंगरे (वय २७, रा. वर्धमान चौक) यांनी दिली आहे. ही घटना सन २०१३ ते २२ डिसेंबर २०१८ दरम्यान घडली होती.
अशोक व्यास (रा. यशोलक्ष्मीनगर), लक्ष्मीकांत तिवारी (रा. तिवारी अपार्टमेंट), संगीता नरेंद्रकुमार पुरोहित (रा. कापड मार्केट हौसिंग सोसायटी), प्रवीण कबाडे, अमोल कबाडे (दोघे रा. शाहू कॉर्नर), बाबूराव शिंत्रे (रा. इचलकरंजी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, पद्मावती एक्स्पोर्ट व स्वस्तिक क्रिएशन या नावाने दोन फर्म असून, यामध्ये अमर डोंगरे यांच्यासह वरील पाचजण भागीदार आहेत, तर बाबूराव शिंत्रे याने अमर यांना व्यवसायाकरिता व्याजाने पैसे दिले होते. दोन्ही व्यवसायामध्ये वरील संशयितांनी चुकीचे हिशेब तयार करून, कंपनीस नफा होत असल्याबाबत सुरुवातीला अमर यांना पटवून दिले. त्यानंतर कंपनीस तोटा होत असल्याबाबतचे वार्षिक ताळेबंद तयार केले. तसेच कंपनीमधील माल परस्पर विक्री करून त्यांची फसवणूक केली.
दरम्यान, दोन्ही व्यवसायामध्ये नुकसान होत असल्याने अमर यांनी पतसंस्था, बँक व खासगी सावकार बाबूराव याच्याकडून कर्ज घेतले. त्यानंतर सर्वांनी पैशासाठी तगादा लावला. यामध्ये अमर यांनी त्यास कंटाळून २२ डिसेंबर २०१८ ला आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती पोलिसांना मिळाली. त्याची शहानिशा करून पोलिसांनी वरील संशयितांवर गुन्हा दाखल केला.