पंचगंगेकडे होणाऱ्या दुर्लक्षाविरोधात कोल्हापूरकरांचे उपहासात्मक आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 06:09 PM2021-02-17T18:09:49+5:302021-02-17T18:11:34+5:30
River Kolhapur- सुमारे २२०० वर्षांचा इतिहास घेऊन वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या संवर्धनासाठी वेळ नसेल तर येथून पुढे कोणत्याही लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या वाढदिवसासाठी आमच्याकडे वेळ नाही, असे सांगत, जोवर कोसळलेल्या नदीघाटाची संरक्षक भिंत बांधत नाहीत, तोवर वाढदिवस होणार नाहीत, असा अनोखा निर्धार बुधवारी कोल्हापूरकरांनी केला.
कोल्हापूर : सुमारे २२०० वर्षांचा इतिहास घेऊन वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या संवर्धनासाठी वेळ नसेल तर येथून पुढे कोणत्याही लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या वाढदिवसासाठी आमच्याकडे वेळ नाही, असे सांगत, जोवर कोसळलेल्या नदीघाटाची संरक्षक भिंत बांधत नाहीत, तोवर वाढदिवस होणार नाहीत, असा अनोखा निर्धार बुधवारी कोल्हापूरकरांनी केला.
पंचगंगा घाटावर कोसळलेल्या घाटाच्या ढिगाऱ्यावर झोपून, हातात भलामोठा फलक घेऊन येत्या एक मार्चपर्यंत दुरुस्ती केली नाही, तर नदीपात्रात उतरून आंदोलन करू, असा इशारावजा अल्टिमेटम्ही देण्यात आला.
पंचगंगा नदी घाटाची संरक्षक भिंत चार महिन्यांपूर्वी ढासळली आहे, याकडे लक्ष वेधूनही अधिकारी, लोकप्रतिनिधी कोणीही दखल घेतली नाही. याचा निषेध म्हणून कोल्हापुरातील सामाजिक संस्था बुधवारी पंचगंगा घाटावर उतरल्या.
यात इंजिनिअरिंग असोसिएशन, शहरभान चळवळ, शहर कृती समिती, आखरी रस्ता समिती, परीख पूल कृती समिती, रेल्वे पॅसेंजर असोसिएशन या संस्थांचे फिरोज शेख, अजय कोरोणे, जीवन बोडके, किशोर घाटगे, रमेश मोरे, अनिल घाटगे, संजयसिंह घाटगे, संतोष रेडेकर, संतोष आयरेकर, राजवर्धन यादव, शिवनाथ बियाणी, सुधीर हांजे, सुशील हांजे यांचा सहभाग होता.
पंचगंगा घाटाचे संवर्धन करण्यासाठी टाळाटाळ होत असेल, त्यांना वेळ नसेल, तर त्यांच्या वाढदिवसासाठी जाणे, शुभेच्छा संदेशावर खर्च करण्यासाठी वेळ नाही, असे उपहासात्मक बॅनर हातात घेऊन या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.