पोलीस प्रशासनाला दिले निवेदन
मुरगूड :
मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर खोटेनाटे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या हे मुरगूड पोलीस स्टेशन हद्दीतील घोरपडे साखर कारखाना आणि पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत. पण, त्यांना मुरगूड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ५७ गावांत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा मुरगूडमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत देण्यात आला. याबाबतचे निवेदनही मुरगूड पोलीस स्टेशनला देण्यात आले.
येथील हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दलितमित्र डी. डी. चौगले होते. यावेळी सर्वांनीच संतप्त भावना व्यक्त करत सोमय्यांचा निषेध केला. स्वत:चे महत्त्व वाढवण्यासाठीच भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, ते घोरपडे कारखाना आणि मुरगूड पोलीस स्टेशनला भेट देऊन आमच्या स्वाभिमानाला डिवचत आहेत. प्रशासनाने त्यांना जिल्हाबंदी करावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून त्यांचा रस्ता अडवू. यावेळी जर कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल, असा इशारा चौगले यांनी दिला. यावेळी स्वागत शहर अध्यक्ष रणजित सूर्यवंशी यांनी केले तर प्रास्ताविक राजू आमते यांनी केले. यावेळी सुनील चौगले, सुधीर सावर्डेकर, डी. डी. चौगले, रणजित सूर्यवंशी, सुधीर सावर्डेकर, राजू आमते, शिवाजी सातवेकर, सुनील चौगले, संजय मोरबाळे, सम्राट मसवेकर, अशोक चौगले, रणजित मगदूम, अमोल मंडलिक, महांतेश पाटील, विक्रम घाटगे, शाहू फर्नांडिस, अमित तोरसे, समाधान चौगले, अविनाश परीट आदी प्रमुख उपस्थित होते.
फोटो ओळ :- मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने किरीट सोमय्या यांना स्टेशन हद्दीत येऊ देणार नाही, त्यांना बंदी करावी, अशा मजकुराचे निवेदन सपोनि विकास बडवे यांना देण्यात आले. यावेळी डी. डी. चौगले, रणजित सूर्यवंशी, राजू आमते, सुधीर सावर्डेकर, संजय मोरबाळे, सुनील चौगले आदी उपस्थित होेते.