कागल : दारू पिऊन घरात शिवीगाळ, मारहाण करून त्रास देत असल्याच्या रागातून मुलाने आपल्या बापाचा डोक्यात पहार मारून खून केल्याचा प्रकार केनवडे (ता. कागल) येथे उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे अपघातात बाप मेल्याचा बनाव या मुलाने रचला होता. मात्र कागल पोलिसांनी संशयावरून तपास करीत दोन दिवसांत खुनाचा प्रकार उघडकीस आणला आहे. दत्तात्रय रामचंद्र पाटील (वय ५४) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी मुलगा अमोल दत्तात्रय पाटील (वय २८, रा. केनवडे) यास अटक केली. खुनाचा हा प्रकार मंगळवारी ३० ऑगस्ट रोजी आठच्या सुमारास केनवडे फाट्याजवळ कागल-निढोरी मार्गावर घडला.
उपविभागीय पोलीस अधिकारी आर. आर. पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे उपस्थित होते.
या घटनेची अधिक माहिती अशी की, दत्तात्रय पाटील हे इचलकरंजीला कामास होते. केनवडे येथे पत्नी आणि मुलगा अमोल राहतात. एक विवाहित मुलगीही आहे. दत्तात्रय पाटील यांना दारूचे व्यसन होते. ते सतत घरात शिवीगाळ तसेच मारहाण करीत. यामुळे मुलगा अमोल चिडून होता. सोमवारी रात्री दत्तात्रय पाटील हे केनवडे फाट्यावर गेल्याचे समजल्यावर निढोरी रस्त्यावर एका पुलाजवळ मुलगा अमोल याने त्यांच्या डोक्यात लोखंडी पहारीने घाव घातला. यात ते ठार झाले. आपल्या वडिलांना अज्ञात वाहनाने धडक दिली असून, यात ते ठार झाल्याचा बनाव मुलाने केला. तशी वर्दीही कागल पोलिसात देण्यात आली. ३१ ऑगस्ट रोजी रात्री अपघाताचा गुन्हा नोंद झाला; पण डोक्यावर एकच घाव आणि बाकी कोठे खरचटलेलेही नाही. यावरून पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तपास सुरू केला. तेव्हा हा प्रकार समोर आला.
०३ दत्तात्रय पाटील