कोल्हापूर : येथील लेखिका सोनाली नवांगुळ यांनी अनुवादित केलेल्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीला शनिवारी साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार जाहीर झाला. सन्मानचिन्ह, ५० हजार रूपये आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अपंगत्वावर जिद्दीने विजय मिळवून त्यांनी साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या धडपडीचा पुरस्काराने गौरव झाला. सोनाली या ‘लोकमत’मध्ये सातत्याने लेखन करतात. प्रादेशिक भाषेतून हा पुरस्कार त्यांना मिळाला असून, ही कादंबरी स्वातंत्र्याचा आग्रह धरणारी आहे.
‘सलमा’ यांच्या मूळ तामिळी कांदबरीचे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यात आले होते. त्याचा अनुवाद नवांगुळ यांनी केला. मनोविकास प्रकाशनच्या ‘भारतातील लेखिका’ या मालेतील हे पुस्तक असून, ते २०१५ साली प्रकाशित झाले हाेते. आतापर्यंत त्यांनी तीन स्वतंत्र पुस्तके लिहिली असून, चार पुस्तकांचे अनुवाद केले आहेत. आतापर्यंत ‘ड्रीमरनर’,‘मध्यरात्रीनंतरचे तास’,‘वारसा प्रेमाचा व वरदान रागाचे’, ‘जॉयस्टिक’ प्रतिष्ठित पुरस्कारांच्या मानकरी असलेल्या नवांगुळ या गेली १३ वर्षे ब्रेल लिपीतील ‘स्पर्शज्ञान’ या पाक्षिकाचे संपादन करत आहेत. पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
नवांगुळ या मूळच्या सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथील असून, सध्या गेली अनेक वर्षे त्या कोल्हापूरमध्ये वास्तव्य करतात. वयाच्या नवव्या वर्षी पाठीवर बैलगाडी पडल्याने पॅराप्लेजिक झालेल्या सोनाली यांनी घरातच राहून पदवीपर्यंतच्या परीक्षा दिल्या. त्यानंतर २००० साली त्यांनी कोल्हापूर येथील ‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकप्ड’ संस्थेत सोशल वर्कर म्हणून काम पाहिले. अपंग असूनही २००७ साली समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्या संस्थेतून बाहेर पडल्या. हालचालींसाठी सुलभ अशा स्वत:च्या वास्तूमध्ये वास्तव्य करणाऱ्या नवांगुळ या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक संस्थांशी निगडीत आहेत.
कोट
साहित्य अकादमीसारख्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने दिलेल्या पुरस्काराने नवी उमेद मिळाली. असे पुरस्कार आगामी वाटचालीसाठी प्रेरणा देणारे ठरतात.
- सोनाली नवांगुळ
१८०९२०२१ कोल-सोनाली नवांगुळ
१८०९२०२१ कोल-सोनाली नवांगुळ पुस्तक