पुन्हा मुलगीच झाली म्हणून थिमेट पाजून मारले, जन्मदात्या आई-वडिलांनीच केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:43 PM2018-12-13T12:43:36+5:302018-12-13T12:46:43+5:30
पुन्हा मुलगीच झाली म्हणून जन्मदात्या आई-वडिलांनीच संगनमताने अवघ्या दोन महिने वयाच्या पोटच्या गोळ्याला थिमेट पाजून ठार मारल्याची घटना शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी येथे घडली.
कोल्हापूर : पुन्हा मुलगीच झाली म्हणून जन्मदात्या आई-वडिलांनीच संगनमताने अवघ्या दोन महिने वयाच्या पोटच्या गोळ्याला थिमेट पाजून ठार मारल्याची घटना शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी येथे घडली.
याप्रकरणी आई जयश्री जयश्री पाडावे (वय २१) आणि वडील प्रकाश बंडू पाडावे प्रकाश पाडावे (२८) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सिध्दी प्रकाश पाडावे ( वय २ महिने) असे मृत बालिकेचे नाव असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे यांनी दिली.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सावर्डी येथील जयश्री व प्रकाश पाडावे यांना दोन वर्षांची प्रांजल ही पहिली मुलगी आहे. त्यांना यावेळी मुलगा होईल, अशी अपेक्षा होती. पण पुन्हा मुलगीच झाल्याने ते नाराज झाले. यातूनच यातूनच त्यांनी संगनमताने ४ आॅक्टोबरला दोन महिने वयाच्या मुलीला थिमेट पाजून ठार मारले.
पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने थिमेट हे कीटकनाशक घरातून बाजूला टाकले. आकस्मिक मृत्यू म्हणून या घटनेची अगोदर माहिती देण्यात आली होती. मात्र, या घटनेचा अधिक तपास करता सत्य समोर आले. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे करीत आहेत.
पोलीस उपनिरीक्षकच बनले फिर्यादी
मृत बालिकेचे शवविच्छेदन करण्यासही या दाम्पत्याने वैद्यकीय अधिकारी यांना विरोध दर्शविला होता. याप्रकरणात फिर्याद देण्यास कुणीही पुढे येत नव्हते. अखेर या घटनेबाबत पोलिस उपनिरिक्षक महादेव जठार यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात आई-वडिलांविरोधात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंद करुन या दाम्पत्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
व्हिसेरा आल्यानंतर गुन्हा उघड
वडिलांनी सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी करण्यास डॉक्टरांना विरोध केला होता. तसेच पोलिसांसोबतही वाद घातला होता. मात्र, उत्तरीय तपासणी करण्यावर पोलिस आणि डॉक्टर ठाम राहिले. तपासणीनंतर व्हिसेरा राखून ठेवला होता. त्याचा अहवाल बुधवारी येताच हा गुन्हा उघड झाला.
पोलिस उपअधिक्षक आर. आर. पाटील यांचा पाठपुरावा
शाहूवाडी विभागाचे पोलिस उपअधिक्षक आर. आर. पाटील यांनी या प्रकरणाचा सुरुवातीपासूनच पाठपुरावा केला. मुलीच्या वडिलाच्या वर्तनावरुन तो काहीतरी लपवित असल्याची शंका त्यांना आली होती.