कोरोनाला विसरून तरुणाईकडून रंगांची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 06:50 PM2021-04-02T18:50:29+5:302021-04-02T18:51:44+5:30

Holi Kolhapur- कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना आणि निर्बंध अधिक कडक होताना त्याला विसरून कोल्हापुरातील तरुणाईने शुक्रवारी रंगांची उधळण केली. त्यातील अनेकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, आदी नियम धाब्यावर बसविले.

A splash of color from youth forgetting the corona | कोरोनाला विसरून तरुणाईकडून रंगांची उधळण

कोरोनाला विसरून तरुणाईकडून रंगांची उधळण

Next
ठळक मुद्देकोरोनाला विसरून तरुणाईकडून रंगांची उधळणसोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसविले

कोल्हापूर : कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना आणि निर्बंध अधिक कडक होताना त्याला विसरून कोल्हापुरातील तरुणाईने शुक्रवारी रंगांची उधळण केली. त्यातील अनेकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, आदी नियम धाब्यावर बसविले.

शहरातील प्रमुख चौकाचौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यांच्या भीतीमुळे मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट होता. रंगपंचमीनिमित्त व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने महाद्वार रोड, गुजरी, शिवाजी रोड, बिंदू चौक परिसरात अघोषित बंदसारखी स्थिती दिसून आली; मात्र गल्ली, कॉलनी, अपार्टमेंटमध्ये युवक, युवती, लहान मुले, आदींनी पिवडीचा धुरळा उडवित रंगपंचमी साजरी केली. काही नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रंगोत्सव करणे टाळले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने रंगपंचमी साजरी करणे टाळा, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत काही नागरिकांनी रंगपंचमी साजरी करणे टाळले; मात्र काहींनी कोरोनाची दुसरी लाट असताना त्याकडे दुर्लक्ष करून रंगांची उधळण केली. त्यामध्ये लहान मुले, तरुणाईचे प्रमाण अधिक होते. लहान मुलांनी सकाळी रंगपंचमी साजरी केली. दुपारी तरुणाई घरातून बाहेर पडली.

नागाळा पार्क, ताराबाई पार्क, स्टेशन रोड, शाहुपुरी, राजारामपुरी, बिंदू चौक, गंगावेश, शिवाजीपेठ, मंगळवारपेठ, बुधवारपेठ, रविवारपेठ, लक्ष्मीपुरी, आदी परिसरांसह उपनगरांमधील गल्ली, कॉलनी, सोसायटी, अपार्टमेंटमध्ये रंगोत्सव झाला. पिवडी, विविध रंगांनी रस्ते रंगले होते. काहींनी रस्त्यांमध्ये पाण्याचा शॉवर लावला होता. मोजक्या ठिकाणी ध्वनियंत्रणावरील गाणी वाजत होती.

काही युवक, युवती गटाने दुचाकीवरून फिरत रंगांची उधळण करत होते. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई केली. उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर रंगपंचमी खेळणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. शहरातील विविध रस्त्यांवरील वर्दळही कमी झाली. सायंकाळी पाचनंतर बाजारपेठांमधील दुकाने काही प्रमाणात सुरू झाल्याने पुन्हा थोडी वर्दळ वाढली.
 

Web Title: A splash of color from youth forgetting the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.