शिंगणापूर उपसा केंद्रातील पाण्याची विनाबिलिंग उचल :चंद्रदीप नरके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 05:44 PM2018-07-17T17:44:44+5:302018-07-17T17:48:25+5:30
शिंगणापूर उपसा केंद्रातून १५४ दशलक्ष लिटर पाण्याचा रोज उपसा महापालिका करत आहे; पण त्यातील ५८.४६ एमएलडी पाण्याचे बिलिंग केले जाते, उर्वरित ६२ टक्के पाण्याचा हिशेब महापालिकेकडे नाही. याची चौकशी करण्याची मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात केली.
कोल्हापूर : शिंगणापूर उपसा केंद्रातून १५४ दशलक्ष लिटर पाण्याचा रोज उपसा महापालिका करत आहे; पण त्यातील ५८.४६ एमएलडी पाण्याचे बिलिंग केले जाते, उर्वरित ६२ टक्के पाण्याचा हिशेब महापालिकेकडे नाही. याची चौकशी करण्याची मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात केली.
हे पाणी गळतीमध्ये आणि चोरीमध्ये वाया जात आहे, परिणामी महानगरपालिकेला यामधून दरवर्षी सरासरी २५ कोटींचा तोटा होत आहे. शहरामध्ये पाणी गळती असणारी ४० ठिकाणे असून त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाने कृती आराखडा तयार करावा, त्यानुसार महानगरपालिकेला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार नरके यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कोल्हापूर शहर पाणी पुरवठा योजनेच्या जल लेखापरीक्षण (वॉटर आॅडिट) अहवालानुसार शहरासाठी शिंगणापूर उपसा केंद्रामधून ११२.१५ दशलक्ष लिटर्स, बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रांमधून ७७.२३ दशलक्ष लिटर्स व कळंबा तलाव येथून ३.४२ दशलक्ष लिटर्स असा एकूण १९२.८० दशलक्ष लिटर्स पाण्याचा उपसा केला जातो.
शहरासाठी १९२.८० दशलक्ष लिटर्स रोज होणाऱ्या पाणी उपशापैकी ३०.२१ टक्के पाण्याचे बिलिंग होत असून हिशेबबाह्य पाण्याचे प्रमाण ६९.२९ टक्के आहे. कोल्हापूर शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या दाब नलिका व गुरुत्ववाहिनीवर मोठ्या प्रमाणात गळती आहे.
सदर गळती काढण्याच्यादृष्टीने १०९.४९ लाखांचे अंदाजपत्रके महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी ६३.२० लाखांच्या अंदाजपत्रकांना महानगरपालिकेने मंजुरी दिली आहे. सदर कामांची निविदा प्रक्रिया सुरू असून निविदा निश्चितीनंतर सदरची कामे तातडीने पूर्ण करून घेण्याचे महानगरपालिकेचे नियोजन आहे.