लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना काळातील निर्बंधांचा जीवनावरही परिणाम झाला. निर्बंधांमुळे अल्पवयीन मुली घरातच लॉक झाल्या. त्यामुळे त्या बेपत्ता होण्याचे प्रमाणही घटले. कोरोना कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातून गेल्या दीड वर्षात २१५ अल्पवयीन मुली रफूचक्कर झाल्या. बहुतांशी मुली १६ ते १७ वयोगटातील असून सुंदर, हॅण्डसम मुले पाहून त्याच्यासोबत गेल्याचे नंतर पोलिसांच्या शोधमोहिमेनंतर उघड झाले. २०१८ ते मे २०२१ पर्यंत तब्बल ६५९ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्यापैकी ६२२ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला यश आले.
कोरोनाच्या दीड वर्षात निर्बंधांचा फटका वयात आलेल्या युवक-युवतींनाही बसला. गेल्या साडेतीन वर्षांत जिल्ह्यातून हरवलेल्या, पळवलेल्या सुमारे दोन हजारांवर महिला व मुलींची पोलीस दप्तरी नोंद झाली. अल्पवयीन मुलगी हरवलेली किंवा पळवून नेलेली असली तरीही पोलिसात त्यांची अपहरणाची नोंद होते. बहुतांशी प्रकरणात महिला व मुली या मर्जीनेच प्रियकारासोबत गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले. ही वस्तुस्थिती मुलगी सापडल्यानंतर उघड होते. परत आलेल्या मुली अगर महिला प्रियकरासोबत जाणेच पसंद करतात. बेपत्ता अल्पवयीन मुली शोधल्यानंतर त्या पालकांसोबत जाण्यास तयार नसल्यास त्यांना शासकीय निरीक्षणगृहात ठेवले जाते.
जानेवारी ते मे २०२१ कालावधीत सुमारे ८६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. तितक्याच प्रमाणात मुलेही बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आले आहे, त्यात काही अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. अनेकवेळा अल्पवयीन असताना पलायन केलेले पोलिसांनी शोधले नंतर ते सज्ञान झालेले असतात, त्यांना पालकांनी नाकारल्यास त्या स्वतंत्रपणे संसार थाटतात.
अल्पवयीन मुली बेपत्ता :
- २०१८ : २०९
- २०१९ : २३५
- २०२० : १२९
- २०२१ मे पर्यंत : ८६
३७ मुलींचा शोध लागेना
मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होते. गेल्या साडेतीन वर्षांत ६५९ मुली बेपत्ता झाल्या, त्यापैकी ३७ मुलींना शोधण्यासाठी पोलिसांची पळापळ सुरू आहे. अनेकदा पोलीस चौकशीसाठी फिर्यादीच्या घरी फोन करतात, त्यावेळी बेपत्ता मुलगी कधीच घरी आलेली असते, पण फिर्यादी स्वत:हून पोलिसांना कळवतच नाहीत.
शोधकार्यातील अडथळा...
अनेकवेळा फिर्यादीला मुलगी कोठे आहे, कोणासोबत गेली याची कल्पना असते. घरातील सदस्य छुपी मदत करतात तरीही ते पोलिसांपासून माहिती लपवतात. गावपातळीवर राजकीय वादातूनही काहीवेळा तपासच करत नसल्याचा आरोप पोलिसांवर होतो. शोध घेण्यासाठी पथकाला स्वतंत्र वाहन नसल्याची मोठी अडचण आहे.
कोट...
लॉकडाऊनमध्ये शाळा, कॉलेज बंद राहिल्याने मुले-मुलींच्या रोजच्या गाठीभेटी बंद झाल्या, त्यामुळे मुली पळून जाण्याचे प्रमाण घटले. मोबाईलचा गैरवापर वाढल्याने अल्पवयीन मुलींवर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी मुलींच्या हालचालींवर पालकांची नजर आवश्यक असते.
- श्रद्धा आंबले, सहा. पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, कोल्हापूर.