सीपीआरमध्ये बालरोग कक्ष त्वरित सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:25 AM2021-05-18T04:25:03+5:302021-05-18T04:25:03+5:30
कोल्हापूर : कोविड तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनाही लागण होण्याची शक्यता असून, त्यामध्ये मृत्यूही ...
कोल्हापूर : कोविड तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनाही लागण होण्याची शक्यता असून, त्यामध्ये मृत्यूही होऊ शकतात. हे टाळण्यासाठीच्या उपाययोजना कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या टास्क फोर्सने सुचविल्या आहेत. त्यानुसार येथील सीपीआर रुग्णालयात कोविड-१९ बालरोग कक्ष व संशयित रुग्णांकरिता वेगळा कक्ष तातडीने स्थापन करावा, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
बालक अतिदक्षता कक्ष आणि एनआयसीयूची स्थापना करणे, जिल्ह्यातील सर्व रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ व इतर खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना प्रशिक्षण देणे व त्यांना शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अंमलबजावणीकरिता प्रवृत्त करणे, अशा बालकांच्या पालकांसाठी जनजागृती साहित्य तयार करावे, गरोदर माता, स्तनदा माता यांना बालकांना होऊ शकणाऱ्या या आजाराबाबत माहिती द्यावी, पिडियाट्रिक व्हेंटीलेटर्स व इतर आवश्यक साहित्य, औषध पुरवठ्याची तयारी करणे, यासाठी जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेचे सहकार्य घेणे, तसेच ज्या बालकांना कोविडसदृश लक्षणे आहेत त्यांच्या पालकांची कोविड चाचणी करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असेही टास्क फोर्सच्या सदस्यांनी सुचविले आहे.
चौकट
ही कार्यवाहीदेखील आवश्यक
जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील काही आठवडे सर्व मोठ्या शासकीय व खासगी रुग्णालयांतील मृत्यूबाबत प्रत्येक आठवड्याला आढावा घेणे.
जिल्ह्यातील व्याधीग्रस्तांचे सर्वेक्षण करून धोका असणाऱ्या नागरिकांचे नियमित निरीक्षण करणे.
वैद्यकीय महाविद्यालयासह सर्वच रुग्णालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अधिष्ठाता यांनी नियमितपणे अतिदक्षता विभागात जाऊन रुग्णसेवेची गुणवत्ता तपासावी.