कोल्हापूर : राज्यसेवा (सामाईक पूर्व परीक्षा) सरकारने शुक्रवारी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. गेल्या सहा महिन्यांमध्ये विविध कारणांमुळे चौथ्यांदा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यातील दोन लाख ६२ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.राज्यसेवेची परीक्षा ५ एप्रिलला होणार होती. कोरोनामुळे ती १३ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. त्यादिवशीच जेईई, नीटची परीक्षा होणार असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) ही परीक्षा २० सप्टेंबरला घेण्याचे जाहीर केले. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ती पुन्हा पुढे ढकलली आणि दि. ११ ऑक्टोबरला घेण्याची घोषणा सरकारने केली. त्यानुसार एमपीएससीकडून तयारी करण्यात आली.
राज्यसेवा परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रेही मिळाली होती. त्यातच एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजातील काही संघटनांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. दुसरीकडे, एमपीएससीकडून परीक्षेची तयारी सुरू होती. त्यामुळे परीक्षा निश्चित तारखेला होणार की, पुढे जाणार याबाबत परीक्षार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ती आता दूर झाली. या परीक्षेची नवीन तारीख राज्य सरकारने लवकर जाहीर करण्याची मागणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांतून होत आहे.कोल्हापुरातून आंदोलनाची सुरुवातआरक्षणाचा निर्णय होईपर्यंत संबंधित परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठीचे आंदोलन कोल्हापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिलीप पाटील, सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे यांनी सुरू केले. त्यातील पाटील, तोडकर यांनी मुंबईतील एमपीएससीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यांनी परीक्षा झाल्यास केंद्रे फोडण्याचा इशारा दिला होता. खासदार संभाजीराजे आणि कोल्हापूरसह राज्यभरातील मराठा समाजातील विविध संघटना, परीक्षार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला.राज्यसेवा परीक्षा दृष्टिक्षेपात१) या परीक्षेसाठी राज्यभरातून नोंदणी केलेले विद्यार्थी : २ लाख ६२ हजार२) कोल्हापुरातून नोंदणी केलेले विद्यार्थी : १३५००३) या परीक्षेद्वारे भरती केल्या जाणाऱ्या जागा : २६०४) किती पदांचा समावेश : उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्य अधिकारी, प्रकल्प अधिकारी अशा विविध २८ पदे.अखेरच्या संधी असणारे परीक्षार्थीं तणावातराज्यसेवेत पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, वैद्यकीय तपासणी, नियुक्ती असे टप्पे आहेत. त्यांचा विचार करून परीक्षा पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक होते. पूर्व परीक्षा घेऊन तिचा निकाल जाहीर होण्यास तीन-चार महिने लागले असते. त्या दरम्यान मराठा आरक्षणाचा निकाल लागला, तर मुख्य परीक्षेत जागा वाढवून देता आल्या येणे शक्य होते. या परीक्षांची विद्यार्थी हे दोन ते तीन वर्षे आधी तयारी सुरू करतात.
परीक्षा वारंवार पुढे गेल्यास त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो, असे मत स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले. या परीक्षा आता पुन्हा पुढे गेल्याने वयोमर्यादेमुळे परीक्षा देण्याची अखेरची संधी असणाऱ्या परीक्षार्थींवर तणाव आला आहे. सध्या या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्यांपैकी साधारणतः २० टक्के परीक्षार्थ्यांना यावेळी अखेरची संधी होती. वयोमर्यादा वाढीचा निर्णय झाला नाही, तर या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्याचा विचार सरकारने करावा, अशी मागणी या तज्ज्ञांनी केली आहे.
परीक्षार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून राज्य सरकार आणि एमपीएससीने या परीक्षेची नवीन तारीख लवकर जाहीर करावी. ज्यामुळे अभ्यासाचा अजेंडा आम्हाला ठरविता येईल.- अजय पोर्लेकर, इस्पुर्ली, ता. करवीर.
गेल्या वर्षापासून या परीक्षेची तयारी करीत आहोत. परीक्षेची वारंवार तारीख पुढे गेल्याने मानसिकतेवर परिणाम होतो. आता आयोगाने या परीक्षेचे पुढील तारीख लवकर जाहीर करावी आणि ती पुन्हा बदलू नये.- श्रद्धा पाटील, विक्रमनगर, कोल्हापूर.