कोल्हापूर, दि. 27 : कर्नाटकातून चंदगड, आजरा, राधानगरी, गगनबावडा असा प्रवास करीत टस्कर हत्तीने पन्हाळा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या कोलीक-पडसाळी परिसरात मुक्काम ठोकला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या हत्तीने या परिसरातील शेतीच्या पिकांचे नुकसान केले आहे; त्यामुळे या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून भीतीचे वातावरण झाले आहे. सावधानतेचा इशारा म्हणून वन खात्याने या परिसरातील ग्रामस्थांना जंगलात व शेतात न जाण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या चार महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, राधानगरी परिसरात धुमाकूळ घालत असलेला नर जातीचा टस्कर हत्ती गेल्या दोन दिवसांपासून पन्हाळा तालुक्यातील कोलीक-पडसाळी या दुर्गम परिसरात वावरू लागला आहे. त्याने नाचणी, भुईमूग, ऊस, आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
हत्ती लोकवस्तीत घुसू नये म्हणून परिक्षेत्र वनाधिकारी प्रशांत तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आर. बी. जाधव यांच्यासह २५ जणांचे पथक कार्यरत आहे. हे पथक हा हत्ती नागरी वस्तीत येऊ नये याकरिता गस्त घालत आहे. यासह परिसरातील शेतकºयांना जंगलात न जाण्याचे आवाहनही करीत आहे. पावसामुळे या परिसरात जाणे कठीण झाल्याने वनखात्याने केवळ या परिसरात गस्त सुरू केली आहे. हत्तीला हुसकावून लावण्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. मात्र, या प्रयत्नांना अद्यापही यश आलेले नाही.