बिलांसाठी ‘कुंभी-कासारी’वर ठिय्या
By admin | Published: March 30, 2015 11:26 PM2015-03-30T23:26:45+5:302015-03-31T00:28:51+5:30
कुंभी-कासारी बचाव मंचचे आंदोलन : लवकरच थकीत बिले अदा करणार : गोधडे
कोपार्डे : कुंभी-कासारी साखर कारखान्याने १५ मार्चअखेर गाळप झालेल्या उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावीत, यासाठी कुंभी-कासारी बचाव मंचने ठिय्या आंदोलन सुरू केले.दरम्यान, कारखान्याचे उपाध्यक्ष शामराव गोधडे यांनी ३१ जानेवारीअखेरची ऊसबिले दिली आहेत. लवकरच फेब्रुवारी, मार्च महिन्यांची बिले देण्याचे आश्वासन दिले. मात्र, आश्वासन नको, ऊसबिले द्या, अन्यथा आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा कुंभी-कासारी बचाव मंचचे प्रवर्तक बाजीराव खाडे यांनी दिल्यानंतर संचालक मंडळही हतबल झाले.सोमवारी दुपारी एक वाजता कुंभी-कासारी बचाव मंचच्यावतीने कुंभी-कासारी कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष शामराव गोधडे यांनी आंदोलकांना सामोरे जाताना साखर कारखान्यांसमोरील साखरेच्या दररोज गडगडणाऱ्या दरामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची माहिती दिली. मात्र, खाडे यांनी शासनाने ३६५ दिवसांच्या पीक कर्जाचा स्लॅब ठरवला आहे. जर वेळेत कर्ज परतावा केला नाही, तर १२ ते १४ टक्के व्याज द्यावे लागणार आहे. आम्ही तुमच्याकडे ऊस पाठविला आहे. शासन मदत करणार नाही हे ऐकायला आम्ही येथे आलेलो नाही, असे ठणकावले. २०१३/१४ मध्ये एफआरपीसाठी ‘कुंभी’ला मिळालेले २० कोटींमधील एक पै ही एफआरपी देण्यासाठी आपण वापरलेला नाही. तो पैसा कुठे गेला, असा प्रश्न केला. सहा लाखांवर गाळप झाले असून, केवळ तीन लाख टनांचे पैसे दिले, असे प्रशासन सांगत असले, तरी बँकेत चौकशी केल्यानंतर १५ ते ३१ जानेवारीचा भरणा झालेला नाही. जर कर्ज परतावा झाला नाही, तर खते मिळणार नाहीत. आमच्या आंदोलनाने आमदारांना विधानसभेत शासनाच्या विरोधात बोलायला बळ मिळेल. जोपर्यंत १५ मार्चपर्यंतची ऊसबिले जमा होणार नाहीत, तोपर्यंत ठिय्या आंदोलन कायम राहणार, असे बाजीराव खाडे यांनी सांगितले. त्यामुळे संचालक मंडळ तेथून उठून गेले. (वार्ताहर)
बचाव मंच कुठे ?
केवळ निवडणुका आल्या की, विरोधकांना शेतकऱ्यांचे हित समजते. आधी ऊस पाठवा मग दराचे बोला. आपल्या कार्यकर्त्यांनी इतर कारखान्यांना ऊस पाठविला. त्यावेळी बचाव मंच कुठे गेला होता. येथे तरी त्यांना संपूर्ण एफआरपी मिळाली आहे का? आपण शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देत असून, पै-पै शेतकऱ्यांना अदा करणार असल्याचे आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले.