कोल्हापूर : शिक्षण संस्थांनी अतिरिक्त फी, डोनेशन घेवू नये, असे सक्त आदेश राज्य शासनाने दिले आहेत. परंतु मनमानी कारभार करणाऱ्या ठराविक शाळा दरवर्षी शासनाच्या सूचनांना केराची टोपली दाखवून, यावर्षी कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत माणसांचे जगणे मुश्कील झाले असून, विद्यार्थी आणि पालकांची लुट केली तर शिक्षणसम्राटांची शिवसेनेशी गाठ असेल, असा सज्जड इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला.
विद्यार्थी आणि पालकांच्या विविध प्रश्नासंदर्भात त्यांनी शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांची भेट घेवून पालकांची लुट करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या.राजेश क्षीरसागर म्हणाले, यावर्षीच्या प्रवेश प्रक्रीये संदर्भात विद्यार्थ्यांना प्रवेशाची कोणती पद्धती अवलंबवावी याच्या सुचना प्रशासनामार्फत शाळांना देण्यात आल्या आहेत. अजून शाळा सुरु होण्यास विलंब असूनही काही शाळांमधून विद्यार्थ्याची फी भरण्यासाठी फोन, मॅसेज केले जात आहेत. शाळाच सुरु नसतील तर फी कशाची भरून घेतली जात आहे? जेंव्हा शाळा सुरु होतील तेथून पुढची फी आकारण्याचे आदेश द्यावेत.
नियम बाह्य फी आकारणी करणाय्रांची गय करू नये. आरटीएच्या २५ टक्के राखीव कोट्यातून काही शाळा प्रवेशास अडवणूक करीत असल्याचे दिसून येत असून, या शाळांनी कारभार सुधारावेत. दरवर्षी फी वाढ करण्याचा अधिकार नसताना बेकायदेशीररित्या फी वाढ केली जाते. दरवर्षी ठराविक शाळा डोनेशन व्यतिरिक्त लाखो रुपयांचा इमारत निधी गोळा करतात. त्यांच्यावर काय कारवाई करावी.