शाहू समाधिस्थळाबाबतचे काम रोखले, पुन्हा वाद, पोलीस बंदोबस्तात बैठक सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:52 PM2019-06-01T12:52:07+5:302019-06-01T12:55:06+5:30
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीसंबंधी निर्माण झालेला वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. संरक्षक भिंतीच्या बांधकामाला विरोध कायम ठेवल्यामुळे आज, शनिवारी पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या महापालिका प्रशासनाला सिद्धार्थनगरातील नागरिकांची पुन्हा रोखल्यामुळे वादाची पुन्हा ठिणगी पडली आहे. याप्रकरणी पोलिसांच्या मध्यस्थीने पुन्हा बैठक सुरु असल्यामुळे हे काम अद्याप सुरु झालेले नाही.
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीसंबंधी निर्माण झालेला वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. संरक्षक भिंतीच्या बांधकामाला विरोध कायम ठेवल्यामुळे आज, शनिवारी पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या महापालिका प्रशासनाला सिद्धार्थनगरातील नागरिकांची पुन्हा रोखल्यामुळे वादाची पुन्हा ठिणगी पडली आहे. याप्रकरणी पोलिसांच्या मध्यस्थीने पुन्हा बैठक सुरु असल्यामुळे हे काम अद्याप सुरु झालेले नाही.
बंदिस्त असणाऱ्या समाधिस्थळाला सिद्धार्थनगरकडील प्रवेशद्वाराचा दुराग्रह सोडावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केल्यानंतरही सिद्धार्थनगरातील नागरिकांनी पुन्हा विरोध कायम ठेवल्याने हा वाद चिघळत आहे. शनिवारी सकाळीच प्रशासनाने कामाची तयारी सुरु केली. नर्सरी बागेतील शाहू महाराजांच्या समाधीभोवती उभारण्यात येत असलेल्या संरक्षक भिंतीवरून सिद्धार्थनगरातील काही नागरिकांनी आक्षेप घेत सिद्धार्थनगराकडील बाजूने प्रवेशद्वार ठेवावा, अशी मागणी केली आहे; तर महापालिका प्रशासनाने त्याला विरोध केला आहे. या वादामुळे संरक्षक भिंतीचे काम काही दिवसांपासून बंद आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी देसाई यांनी समन्वयातून मार्ग काढण्याकरिता बैठक आयोजित केली होती.
सकाळी महापौर सरिता मोरे,उपमहापौर भूपाल शेटे, श्रीधर पाटणकर, नेत्रदीप सरनोबत यांच्यासह प्रशासनातील कर्मचारी समाधीस्थळी पोहोचले, परंतु त्यांच्यात आणि शहाजी कांबळे, संजय माळी, वसंत लिंगनूरकर यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलिप देसाई यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला परंतु नागरिक ऐकायला तयार नव्हते. अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनीही मोठा बंदोबस्त यावेळी घटनास्थळी ठेवला आहे. समाज मंदिरात पुन्हा पोलिसांच्या पुढाकाराने बैठक सुरु आहे. त्यामुळे तूर्ततरी काम सुरु झालेले नाही.