गौरवाडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:17 AM2021-06-24T04:17:45+5:302021-06-24T04:17:45+5:30
बुबनाळ : गौरवाड (ता. शिरोळ) येथील बेघर वसाहत येथे अंगणात खेळणाऱ्या दोन लहान मुलींवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून गंभीर ...
बुबनाळ : गौरवाड (ता. शिरोळ) येथील बेघर वसाहत येथे अंगणात खेळणाऱ्या दोन लहान मुलींवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. नाजिया औरंग सनदी (वय ३) व मसिरा औरंग सनदी (वय ५) अशी त्या मुलींची नावे असून, या हल्ल्यात सुदैवाने मुलींचा जीव वाचला आहे. या मुलींना पुढील उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या कुत्र्यांनी गावातीलच दहा ते पंधरा कुत्र्यांवर हल्ला चढवत दहशत माजवली आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, गौरवाड येथील बेघर वसाहत येथे मसिरा व नाजिया या दोन मुली अंगणात खेळत होत्या. यावेळी अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने मसिरा हिच्या डाव्या हाताला चावा घेतला. यानंतर नाजिया हिच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्या. ही घटना घडताच घरातील नातेवाइकांनी घटनास्थळी दाखल होऊन त्या कुत्र्यापासून मुलींचा जीव वाचविला आणि तातडीने या मुलींना सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या घटनेनंतर पिसाळलेल्या कुत्र्याने गावातीलच दहा ते पंधरा कुत्र्यांवर हल्ला चढवत त्यांचा चावा घेतला आहे. त्यामुळे या पिसाळलेल्या कुत्र्याने गावात दहशत माजवली असून, भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.