जिल्हाभर घामाच्या धारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:16 AM2021-06-30T04:16:45+5:302021-06-30T04:16:45+5:30
कोल्हापूर : ढगाळ वातावरण आणि किरकोळ स्वरूपात हजेरी लावणाऱ्या पावसाने सोमवारी दुपारनंतर मात्र एकदमच उघडीप घेतली. मंगळवारी दिवसभर उन्हाळ्याला ...
कोल्हापूर : ढगाळ वातावरण आणि किरकोळ स्वरूपात हजेरी लावणाऱ्या पावसाने सोमवारी दुपारनंतर मात्र एकदमच उघडीप घेतली. मंगळवारी दिवसभर उन्हाळ्याला लाजवेल असे कडकडीत ऊन पडल्याने अक्षरश: घामाच्या धारा वाहू लागल्या. उन्हामुळे उगवलेल्या पिकातील आंतरमशागती वेगावल्या असून रोप लागण मात्र खोळंबली आहे.
जिल्ह्यात मागील पंधरवड्यात अक्षरश: पूर येईपर्यंत पाऊस कोसळला. जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच पूर येण्याची ही दुर्मीळ घटना घडली. यानंतर पावसाची उघडझाप सुरूच राहिली. जोर कमी असलातरी कधी ऊन तरी कधी पाऊस असा गेले आठवडाभर खेळ रंगला आहे. सोमवारी दुपारपर्यंत असेच वातावरण होते. दुपारीही बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पण त्यानंतर एकदम वातावरण खुले झाले आणि उन्हाचा चटका जाणवू लागला. मंगळवारी दिवस उन्हाचा तडाखा कायम राहिल्याने एक पावसाळ्यात अंगाची लाहीलाही झाली. तापमानाचा पाराही ३० अंशाच्या पुढे गेला.
दरम्यान पाऊस थांबल्याने सध्या भात, सोयाबीन, भुईमूग या क्षेत्रातील उगवण झालेल्या पिकांमध्ये तण काढण्याची कामे जोरात सुरू आहेत. जमिनीत ओलावा कमी असल्याने भर खते देता येत नसली तरी विद्राव्य खतांच्या फवारण्या करून पिकाची वाढ चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत.
आर्द्रा पाठोपाठ तरणाही कोरडाच
सध्या आर्द्रा हे पावसाचे नक्षत्र सुरू आहे. ५ जुलैला तरणा पाऊस सुरू होणार आहे. तथापि पारंपरिक अंदाजानुसार या नक्षत्रात जोरदार पाऊस होणार नाही. त्यानंतर मात्र १६ जुलै रोजी निघणारा म्हातारा पाऊस मात्र जोरदार बरसणार असल्याचा अंदाज आहे. आर्द्रा पाठोपाठ तरणाही कोरडाच जाणार असल्याचे गृहीत धरून शेतकऱ्यांनी मशागतीची कामे उरकण्यावर भर दिला आहे. मात्र ज्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत, त्यांना मात्र पावसाची प्रतीक्षा आहे.
रोपलागणी खोळंबल्या
रोपलागणी करण्याइतपत पावसाचा जोर नाही, त्यामुळे सध्या रोपे तयार आहेत, पण पाऊस नसल्याने चिखलगुट्टाच तयार नसल्याने लागणी करण्यावर मर्यादा येत आहे. शिवाय कृषिपंपाचा वापर करून लागणीचे नियोजन करायचे म्हटले तर पंधरा दिवसांपूर्वी अचानक आलेल्या पुरात नदीकाठच्या बहुतांश मोटारी पाण्याखाली बुडाल्या होत्या. त्याच्या दुरुस्तीची कामे सुरु असल्याने शेतकऱ्यांची गोची झाली आहे. तरीदेखील इंजिनाच्या मदतीने पाणी साठवण्याची तयारी दिसत आहे.