कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार एंट्री

By admin | Published: June 29, 2016 01:00 AM2016-06-29T01:00:37+5:302016-06-29T01:02:45+5:30

सलग दुसऱ्या दिवशीही संततधार : उसासह सर्वच पिकांना जीवदान; शेतकरी सुखावला

Strong entry of rain in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार एंट्री

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार एंट्री

Next


कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाने दमदार एंट्री घेतली असून दिवसभर संततधार सुरू होती. सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्याने उसासह सर्वच पिकांना जीवदान मिळाले आहे.
सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात पावसाची संततधार होती. गेले तीन दिवस वातावरणात कमालीचा गारठा असून, या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा, चंदगड, आजरा तालुक्यांसह उर्वरित तालुक्यांतही दमदार पाऊस सुरू असून असून, नद्यांच्या पाणीपातळीतही चांगलीच वाढ झाली आहे
आजऱ्यात पावसाची संततधार
आजरा : आजरा शहरासह तालुक्यात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार सुरू असून, सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्याने उसासह सर्वच पिकांना जीवदान मिळाले आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने हिरण्यकेशी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे.
चित्री प्रकल्पक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. सलग दोन दिवस पावसामुळे ऊस व भात पिकांसह सोयाबीन पिकालाही जीवदान मिळणार आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास भात रोप लावणीची कामे येत्या चार दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. एकंदर पावसाच्या हजेरीने शेतकरी वर्गासह सामान्य माणूस सुखावला आहे.
भादोले परिसरात पाऊस
भादोले : भादोले परिसरात मंगळवारी सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. गेले तीन दिवस वातावरणात कमालीचा गारठा असून, मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.तालुक्यात यंदा वळीव आणि मान्सूनच्या पावसानेही कमी प्रमाणात हजेरी लावली. वळीव पाऊस मे ऐवजी जूनच्या पहिल्या आठवड्यात काही प्रमाणात पडला. त्यानंतर मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली नाही. मंगळवारी सकाळपासून भादोले परिसरात हलक्या सरी बरसल्या. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कागलमध्येही रिपरिप
म्हाकवे : कागल तालुक्यात सोमवारी पावसाने दमदार एंट्री करत सरासरी १४ मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक बिद्री मंडलमध्ये २८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सिद्धनेर्ली मंडलमध्ये सर्वांत कमी
०६ मि.मी. पाऊस झाला.
या महिनाभरात अत्यल्प म्हणजेच १०८ मि.मी. पाऊस झाला आहे. गतवर्षी जून महिन्यात २२० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. तालुक्यामध्ये कमीत कमी ६५० मि.मी. इतका पाऊस अपेक्षित असल्याने आगामी दोन महिन्यांत जोरदार पावसाची गरज आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात वळवाच्या हजेरीमुळे तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी भात, सोयाबीन, भुईमूग, आदी पिकांच्या पेरण्या पूर्ण केल्या. त्यानंतर चार-आठ दिवसांनी हलक्या स्वरूपात झालेल्या पावसामुळे या पिकांची उगवण झाली आहे. त्यामुळे या पिकांसह उसाला पावसाची नितांत गरज होती. मंगळवारीही पावसाची दिवसभर रिपरिप सुरूच होती. दरम्यान, सोमवारी दिवसभर मुरगूड मंडलमध्ये १५ मि.मी., कागल ११ मि.मी., केनवडे १६, सेनापती कापशी १०, खडकेवाडा ०८ मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे.
धामणी खोऱ्यात दमदार पाऊस
म्हासुर्ली : लांबलेल्या मान्सूनने गेल्या दोन दिवसांपासून धामणी खोऱ्यात दमदार सुरुवात केल्याने बळिराजा सुखावला आहे. सात महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर या खोऱ्याची जीवनदायीनी धामणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. या पावसाळ्यात प्रथमच दुथडी भरून वाहणारी ही जिल्ह्यातील पहिलीच नदी आहे. गेल्या चार महिन्यांपासून बंद असणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजना सुरू होण्याची शक्यता असून, तीव्र पाणीटंचाईवर काहीसा दिलासा मिळणार आहे.

Web Title: Strong entry of rain in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.