पोहायला शिकताना विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:23 AM2021-05-23T04:23:25+5:302021-05-23T04:23:25+5:30
कळे : कुंभी नदीत पोहायला शिकताना परखंदळे (ता. पन्हाळा) येथील ...
कळे : कुंभी नदीत पोहायला शिकताना परखंदळे (ता. पन्हाळा) येथील प्रसाद गणपती देसाई (वय १६) या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. २२) सकाळी साडेसातच्या सुमारास गोठे पुलाजवळ घडली. दहावीच्या वर्गात शिकत असणारा प्रसाद देसाई हा गेल्या काही दिवसांपासून कुंभी नदीपात्रात पोहायला जात होता. त्याला अजून नीट पोहता येत नव्हते.
शनिवारी सकाळी मित्रांसोबत तो नेहमीप्रमाणे पोहायला गेला; पण नदीपात्रात गेल्यानंतर त्याला पाण्याचा अंदाज आला नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. त्यावेळी मित्र त्याच्यापासून लांब असल्याने त्याला वाचवू शकले नाहीत. दोन तासांच्या प्रयत्नानंतर सकाळी सव्वानऊच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
याबाबतची फिर्याद प्रसादचे नातेवाईक जगदीश दगडू पाटील यांनी कळे पोलिसांत दिली.
घटनास्थळी कळे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सी.पी.आर.ला पाठविला. दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई , वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.
फोटो २२ प्रसाद गणपती देसाई