Navratri2022: पाठ्यपुस्तकाच्या रूपात अवतरली नवदुर्गा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 01:18 PM2022-09-29T13:18:31+5:302022-09-29T14:00:46+5:30
नऊ मुलींनी हातात शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके घेऊन 'सरस्वतीचा' दुर्गा रूपातील देखावा सादर केला
श्रीकांत ऱ्हायकर
धामोड : धामोड (ता. राधानगरी) येथील सह्याद्री हायस्कूलमधील विद्यार्थीनींनी नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून पाठ्यपुस्तकाच्या रूपात नवदुर्गा अवतरली. सहाय्यक शिक्षक एस .एम.ऱ्हायकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थीनींनी दुर्गामातेचे एक रूप सादर करत अनोख्या पद्धतीने संदेश दिला. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाने विद्यार्थीही भारावून गेले. आजच्या काळातील स्त्री शिक्षणाचे महत्व अधोरेखीत करण्याच्या उद्देशाने आम्ही हा देखावा सादर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे शिक्षक ऱ्हायकर यांनी सांगितले.
विज्ञान प्रदर्शन असो की शैक्षणिक अध्ययन -अध्यापन किंवा सहशालेय उपक्रम सह्याद्री हायस्कूल नेहमीच आगळे-वेगळे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात नेहमी पुढे असते. परीसरातील जवळपास २५ वाडया वस्त्यावरील ५५० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत शाळेने आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे.
शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने शाळेत दांडीया खेळाचे आयोजन केले होते. या खेळादरम्यान दहावीच्या विद्यार्थीनींनी स्त्री शिक्षणाचे महत्व व गरज या विषयावर अनोख्या पद्धतीने संदेश दिला. नऊ मुलींनी हातात शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके घेऊन 'सरस्वतीचा' दुर्गा रूपातील देखावा सादर केला. टाळ्यांच्या कडकडाटात या देखाव्याला विद्यार्थ्यांनी दाद दिली. यावेळी शाळेचे प्राचार्य एस .एल. उगारे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.