शिवाजी विद्यापीठाची उपकेंद्रे १ लाख ३९ हजार विद्यार्थ्यांना ठरणार उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:17 AM2021-07-08T04:17:10+5:302021-07-08T04:17:10+5:30
कोल्हापूर : सांगली, सातारा जिल्ह्यांत शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र झाल्यास तेथील एकूण १ लाख ३९ हजार ६७१ विद्यार्थ्यांना ही केंद्रे ...
कोल्हापूर : सांगली, सातारा जिल्ह्यांत शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र झाल्यास तेथील एकूण १ लाख ३९ हजार ६७१ विद्यार्थ्यांना ही केंद्रे उपयुक्त ठरणार आहेत. त्यांना अभ्यासक्रमासह अन्य सुविधा मिळणार आहेत. शुल्क भरणे, अर्ज करणे, आदी विविध शैक्षणिक कामांसाठी विद्यापीठात मारावा लागणारा हेलपाटा थांबणार आहे. त्यांच्या वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे.
विद्यार्थ्यांचा त्रास कमी करण्यासाठी सांगली, सातारा जिल्ह्यांत उपकेंद्र निर्माण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्या अनुषंगाने शिक्षण संचालकांमार्फत सविस्तर प्रस्ताव पाठविण्यासाठी सन २०१३ मध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या कारकिर्दीमध्ये समितीची स्थापना झाली. या समितीच्या प्रस्तावाला शिक्षण विभागाने मान्यता दिली. त्यानंतर सांगली, सातारा येथे उपकेंद्र साकारण्यासाठी येथे प्रत्येकी सुमारे २०० एकर जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव विद्यापीठाने संबंधित जिल्हा प्रशासनाला पाठविला. निधी उपलब्धतेबाबत शासनाला प्रस्ताव सादर केला. सांगली, सातारा जिल्हा प्रशासनाने सुचविलेल्या जागांमध्ये काही तांत्रिक स्वरूपातील अडचणी उद्भवल्या. त्यामुळे जागा उपलब्धतेबाबतचा प्रस्ताव पुढे सरकला नाही. गेल्या महिन्यात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्य शासनाने सांगली जिल्ह्यातील उपकेंद्राला तत्वत: मान्यता दिली असल्याचे जाहीर केले. त्यामुळे तेथील उपकेंद्राचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, सातारा येथील उपकेंद्राबाबत काहीच झालेले नाही. सातारा येथे ‘कर्मवीर छाया’ या इमारतीमध्ये विद्यापीठाचे विभागीय केंद्र, तर सांगलीतील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राचे विभागीय केंद्र कार्यान्वित आहे; पण या ठिकाणी मर्यादित स्वरूपात काम चालते. विद्यार्थी आणि महाविद्यालयांची वाढती संख्या लक्षात घेता, या ठिकाणी स्वतंत्र आणि व्यापक असे उपकेंद्र होणे आवश्यक आहे. ही केंद्रे सांगलीमधील आटपाडी, जत, तर साताऱ्यामधील शिरवळ, माढा, मेढा, आदी लांबच्या अंतरावरील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
चौकट
या उपकेंद्रांतून विद्यार्थ्यांना हे मिळणार
या उपकेंद्रांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्थानिक कृषी, उद्योग, व्यवसाय, आदी क्षेत्रांतील गरजा लक्षात घेऊन नवनवीन अभ्यासक्रमांची सुरुवात होईल. कौशल्य विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अद्ययावत पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होतील. अभ्यासक्रमांचे आणि परीक्षांचे अर्ज व शुल्क भरणे, गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. संलग्नित महाविद्यालयांमधील संलग्नता, विविध स्वरूपातील मान्यता मिळविणे, प्राध्यापकांचे पीएचडीचे शोधनिबंध, संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण करणे, आदी सुविधा मिळणार आहेत. या उपकेंद्रांचा विस्तार झाल्यास तेथे ग्रंथालय, वसतिगृहाचीदेखील सुविधा मिळू शकते.