जयसिंगपुरात रेशीम कोष प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:24 AM2021-05-13T04:24:11+5:302021-05-13T04:24:11+5:30
* राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची माहिती जयसिंगपूर : राज्य शासन आणि रेशीम संचालनालयाच्यावतीने जयसिंगपूर येथे रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र ...
* राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची माहिती
जयसिंगपूर : राज्य शासन आणि रेशीम संचालनालयाच्यावतीने जयसिंगपूर येथे रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी मंत्रालय बैठकीत दिले, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
बारामती येथे रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रालयातील बैठकीत मान्यता दिली. यावेळी जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गतवर्षी सुरू केलेल्या रेशीम कोष खरेदी विक्री केंद्राबाबतची माहिती वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना दिली. बारामतीच्या धर्तीवर जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोष उद्योग प्रशिक्षण केंद्र सुरू करावे अशी मागणी राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी केली. यावर जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोष प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासंबंधीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याबाबतचे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधीत विभागाला दिले असल्याची माहिती राज्यमंत्री यड्रावकर यांनी दिली.
कोट - सध्या राज्यातील रेशीम कोष उत्पादन ४५० मेट्रिक टन असून ते ९०० मेट्रिक टनापर्यंत नेण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनसुद्धा दुप्पट होणार असल्याने उद्योजकांना इतर राज्यांतून रेशीम सूत खरेदी करण्याची आवश्यकता भासणार नाही. शिरोळ तालुक्यामध्ये हे प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यास कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकणामधील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
- डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्यमंत्री