सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल : महाराष्ट्र, प्रिन्स शिवाजी, कोल्हापूर, न्यू हायस्कूलची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:11 AM2018-07-21T11:11:57+5:302018-07-21T11:17:17+5:30
कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित केलेल्या सुब्रतो मुखर्जी १४ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल, प्रिन्स शिवाजी इंग्लिश स्कूल, न्यू हायस्कूल, आदी संघांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करत आगेकूच सुरू ठेवली.
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित केलेल्या सुब्रतो मुखर्जी १४ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल, प्रिन्स शिवाजी इंग्लिश स्कूल, न्यू हायस्कूल, आदी संघांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करत आगेकूच सुरू ठेवली.
विभागीय क्रीडा संकुलात शुक्रवारी सकाळी झालेल्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्र हायस्कूल संघाने न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलचा ४ गोलनी पराभव केला. महाराष्ट्रच्या संकेत मेढे, शुभम बेडेकर यांनी प्रत्येकी एक व प्रशांत सालबादे याने दोन गोल नोंदविले.
प्रिन्स शिवाजी इंग्लिश स्कूलने सेंट अँथोनी स्कूलवर १ गोलने मात केली. एकमेव गोल प्रतीक कांबळे याने नोंदविला. कोल्हापूर इंग्लिश स्कूलने फोर्ट अकॅडमीवर एक तर न्यू हायस्कूलने आनंद इंग्लिश स्कूलवर तीन गोेलने मात केली.
राधाबाई शिंदे स्कूल आणि करवीर प्रशाला यांच्यातील सामन्यावेळी करवीर प्रशाला शाळेचा संघ उपस्थित राहिला नाही. पोदार इंटरनॅशनल स्कूलने इंदिरा गांधी हायस्कूलवर मात केली. हा विजयी गोल पोदारकडून चिन्मय मुदगडे याने नोंदविला.
कोल्हापूर इंग्लिश स्कूलने महानगरपालिका जरगनगर विद्यालयावर १ गोलनी मात केली. यश पाटीलने हा गोल नोंदविला. स. म. लोहिया हायस्कूलने महावीर इंग्लिश स्कूलवर ३-२ अशी टायब्रेकरवर मात केली. छत्रपती शाहू विद्यालयाने प्रायव्हेट इंग्लिश स्कूलवर दोन गोलने मात केली.
शाहू दयानंद हायस्कूलने माधवराव बागल हायस्कूलवर २-० अशा फरकाने पराभव केला. शिलादेवी डी. शिंदे हायस्कूलने चाटे इंग्लिश स्कूलचा टायब्रेकरवर २-१ असा पराभव केला. जयभारत हायस्कूलने विमला गोयंका स्कूलचा २-१ अशी टायब्रेकरवर मात केली. अखेरच्या सामन्यांत शांतीनिकेतन स्कूलने शिवाजी मराठा हायस्कूलचा ०-१ असा टायब्रेकरवर पराभव केला.
मैदानात मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने शालेय विद्यार्थ्यांचा कस लागत आहे. एकूणच मैदानाची स्थिती पाहिली तर संयोजकांनी अन्यत्र मैदानाचा पर्याय उपलब्ध करावा. अशी मागणी पालकांतून होत आहे.