लोकसंख्या वाढीचा वेग घटला, उपाययोजनांना यश : आठ वर्षांत अडीच लाख लोकसंख्या वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:03 AM2018-07-10T01:03:44+5:302018-07-10T01:04:22+5:30
कोल्हापूर : गेल्या ५८ वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्येमध्ये २५ लाख ३७ हजार ३९९ इतकी वाढ झाली आहे. मात्र, २00१ ते २0११ या दहा वर्षांमध्ये लोकसंख्यावाढीचा जो वेग होता तो पुढच्या आठ वर्षांमध्ये लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यामध्ये आजरा तालुका, पन्हाळा आणि मलकापूरमध्ये लोकसंख्या वाढण्याऐवजी घटत चालल्याचे, तर करवीर, हातकणंगले तालुक्यांमध्ये लोकसंख्येची वाढ होताना दिसत आहे.
जागतिक लोकसंख्या दिन ११ जुलैला साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्णाच्या आकडेवारीची माहिती घेतली असता अनेक बाबी समोर आल्या आहेत. कोल्हापूर शहराचा समावेश करवीर तालुक्यामध्ये असल्याने साहजिकच जिल्ह्णात सर्वाधिक लोकसंख्या या तालुक्याची आहे.
करवीर तालुक्याची २०११ ची लोकसंख्या १० लाख ३७ हजार असून, त्यामध्ये कोल्हापूर शहराच्या साडेपाच लाख लोकसंख्येचा समावेश आहे.
मात्र, कोल्हापूर शहरासह करवीर तालुका हा २0१८ च्या आकडेवारीनुसार ११ लाख ३३ हजार ६२६ वर पोहोचला असून, गेल्या आठ वर्षांत शहर आणि तालुका मिळून ९६ हजारांनी लोकसंख्या वाढली आहे.
करवीर, हातकणंगले, शिरोळमध्ये मोठी वाढ (नगरपालिका वगळून)
२0११ ची लोकसंख्या आणि २0१८ चा विचार करता करवीर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांतील लोकसंख्येमध्ये भरीव वाढ होताना दिसत आहे. करवीरची ५४८१३, हातकणंगले ४८00२ आणि शिरोळ १८५८0 इतकी लोकसंख्या गेल्या आठ वर्षांमध्ये वाढली आहे.
शहरांपेक्षा ग्रामीण लोकसंख्येत वाढ
गडहिंग्लज, इचलकरंजी, वडगाव, कागल, मुरगूड, पन्हाळा, मलकापूर, जयसिंगपूर, कुरुंदवाड या नऊ नगरपालिका क्षेत्रामध्ये गेल्या आठ वर्षांत ३८६८५ इतकी लोकसंख्या वाढली असून, याउलट बाराही तालुक्यांची लोकसंख्या १ लाख ७८ हजार ८४८ ने वाढली आहे.