कोल्हापूर : केवळ अभ्यास एके अभ्यास असा प्रकार मी कधीच केला नाही. माझ्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्याकडे मी लक्ष दिले. म्हणूनच एनडीएमध्ये मी हे यश मिळवू शकलो, असे मनोगत एनडीए परीक्षेत देशात पहिल्या आलेल्या रोनित नायक याने व्यक्त केले.
नायक याच्या निवडीनंतर त्यांची प्रशाला असलेल्या डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने सोमवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी नायक याने आपल्या यशाचा मार्ग सांगितला.
रोनित म्हणाला, दहावीपर्यंत मी नियमित अभ्यास करत होतो; परंतु वडील नौदल अधिकारी असल्यामुळे घरी मला पोषक वातावरण मिळाले. त्यामुळे एनडीए करायचे हे मी शालेय जीवनापासूनच ठरवले होते. मी मूळचा ओरिसाचा. मात्र, वडील नोकरीनिमित्त गोव्यात आहेत. तेथेच माझे शालेय शिक्षण झाले. सायरस पूनावालामध्ये आम्हाला एनडीएच्या परीक्षेसाठी पूर्ण तयार केले गेले. या काळात मी केवळ आणि केवळ एनडीए उत्तम पद्धतीने पूर्ण करणे यावरच माझे लक्ष केंद्रित केले; परंतु देशात पहिला येईल, असे मला वाटले नव्हते.
शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव पोळ म्हणाले, यापुढच्या काळात नववीपासूनच एनडीएबाबत विद्यार्थ्यांमध्ये जाणीवजागृती केली जाणार आहे. सचिव आणि स्कूलच्या अध्यक्षा विद्या पोळ म्हणाल्या, शासकीय आणि लष्करी अधिकारी बनवण्याच्या हेतूने आम्ही ही शाळा सुरू केली. त्याला चांगले यश येताना दिसत आहे. मात्र कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी जिद्द आण कष्टाच्या जोरावर आता या परीक्षांसाठीही पुढे आले पाहिजे.
यावेळी स्कूलच्या आर्मड् फोर्सेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटचे चेअरमन विश्वास कदम आणि संचालक मेजर चंद्रसेन कुलथे यांनी यावेळी एनडीएची परीक्षा पद्धती आणि त्यासाठी सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने दिले जाणारे योगदान याची माहिती दिली. यावेळी संचालक डॉ. सरदार जाधव, प्राचार्य मारुती कामत उपस्थित होते.
१५०३२०२१ कोल रोनित नायक