लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : म्युकरमायकोसिसच्या १०३ रुग्णांवरील शस्त्रक्रिया यशस्वी करून सीपीआरच्या कान-नाक-घसा विभागाच्या सर्व डॉक्टरांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. गेल्या दीड महिन्यात या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून मंगळवारी १०० शस्त्रक्रियांचा टप्पा पार पडला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक रुग्णांना म्युकरमायकाेसिसचा प्रादूर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले. नाकाच्या पाठीमागील बाजूस काळी बुरशी तयार होते. ती डोळ्यांच्या पटलावर पसरून दृष्टी जावू शकते. तर मेंदूपर्यंत जावून रुग्णाचा मृत्यूही होतो. कोल्हापूर जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात अल्प प्रमाणात रुग्ण होते. परंतु आता ही संख्या वाढत आहे. शरीरात मुख्यतः सायनस, डोळे आणि मेंदू यामध्ये याचा वेगाने प्रसार होत असल्याने नागरिकांमध्ये या आजाराबाबत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा जुनाच आजार असून तो संसर्गजन्य आजार नाही आणि या आजारावर यापूर्वी ही सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून अनेक रुग्ण बरेही झाले आहेत. हा रोग पहिल्या टप्प्यात असतानाच जर आपण उपचार घेतले तर या रोगास अटकाव करता येतो.
या आजाराच्या उपचारासाठी कान, नाक, घसा तज्ज्ञ यांचा मुख्य सहभाग असतो. हा आजार बरा करण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करून ही काळी बुरशी काढण्याची गरज असते. एक शस्त्रक्रिया साधारण चार ते पाच तास चालते. सध्या सीपीआरमध्ये दोन शस्त्रक्रियागृह सकाळी साडेआठपासून ते संध्याकाळी सातपर्यंत सुरू आहेत. या विभागाच्या डॉक्टर्सकडून रोज चार ते पाच शस्त्रक्रिया केल्या आहेत. या खर्चिक शस्त्रक्रियेसाठी नागरिक प्राधान्याने सीपीआरलाच प्राधान्य देत असल्याने या विभागावरील ताण वाढला आहे. परंतु रुग्णांची गरज ओळखून डॉक्टर्सनी वेळीच शस्त्रक्रिया करत अनेकांवर यशस्वी उपचार केले आहेत. यासाठी पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा नियोजन समितीमधून उपकरणांसाठी निधी उपलब्ध करून दिला.
कोट
जिल्ह्यातून म्युकरमायकोसिसचे रुग्ण सीपीआरमध्ये येत आहेत. त्यांच्यावर आवश्यक्तेनुसार शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. अशा १०३ शस्त्रक्रिया आतापर्यंत झाल्या आहेत. सर्वसामान्यांसाठी असलेल्या या रुग्णालयाच्या माध्यमातून आम्ही ही सेवा देत असल्याचे समाधान आहे.
डॉ. अजित लोकरे, विभागप्रमुख, कान-नाक-घसा विभाग,
राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर
चौकट
यांचे आहे योगदान
अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे, डॉ. वासंती पाटील, डॉ. मिलिंद सामानगडकर, डाॅ. स्नेहल सोनार, डॉ. दिलीप वाडकर, कनिष्ठ निवासी डॉॅ. जीत मेहता, डॉ. विशाल नायर, डॉ. उज्ज्वला कोळेकर, डॉ. सीजा, डॉ. अनुप, डॉ. अक्षय, डॉ. नबील, भूलतज्ज्ञ डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. पवार यांनी या शस्त्रक्रियांसाठी योगदान दिले आहे.
चौकट
खासगीमध्ये सहा लाखांवर खर्च
म्युकरमायकोसिसच्या रुग्णावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी किमान सहा लाख रुपये खर्च येतो. मात्र सीपीआरमध्ये ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात येते. यासाठीची आवश्यक इंजक्शन्सही मोफत उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे सीपीआरचे महत्त्व पुन्हा एकदा अधाेरेखित झाले आहे.
चौकट
सीपीआरमधील स्थिती
आतापर्यंतचे म्युकरचे दाखल झालेले रुग्ण १५७
सध्या उपचार घेत असलेले ६६
शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेले २०
बरे हाेवून घरी गेलेेले रुग्ण ५६
आतापर्यंतचे मृत्यू ३५
आतापर्यंतच्या शस्त्रक्रिया १०३