म्युकरच्या रुग्णावर यशस्वी हृदयशस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:17 AM2021-07-01T04:17:44+5:302021-07-01T04:17:44+5:30
कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालयात म्युकर मायकोसिसची लागण झालेल्या रुग्णावर यशस्वी हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली ...
कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालयात म्युकर मायकोसिसची लागण झालेल्या रुग्णावर यशस्वी हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राज्यातील म्युकरच्या रुग्णावर हृदयशस्त्रक्रिया पहिलीच असल्याचा दावा करण्यात आला आहे.
येथील सीपीआरमध्ये म्युकरवर मोफत उपचार करण्यात येतात. आतापर्यंत या ठिकाणी म्युकरच्या १०३ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ६२ वर्षांच्या वृद्धाला म्युकरची लागण झाली होती. चेहरा सुजलेला होता. हिरड्या आणि नाकातून म्युकरचा संसर्ग डोळ्यावर परिणाम करण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे तातडीने म्युकरची शस्त्रक्रिया करण्याची गरज होती.
ही शस्त्रक्रिया करण्याआधी भूल देण्याआधीच या रुग्णाला हृदयविकाराची लक्षणे असल्याचे जाणवले. ही बाब संबंधितांनी कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अजित लोकरे यांच्या कानावर घातली. लोकरे यांनी सहकारी डाॅ. मिलिंद सामानगडकर, डॉ. वासंती पाटील यांच्याशी चर्चा करून हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अक्षय बाफना यांच्याकडे रुग्ण सोपवला. त्यांनी तपासणी केली असता या रुग्णाला गंभीर हृदयरोग असल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णाच्या रक्तवाहिन्यांकडे तीन ब्लॉकेज असल्याचे स्पष्ट झाल्याने यावर लगेच निर्णय घेणे आवश्यक होते. याची कल्पना नातेवाईकांना दिली. त्यांनी मान्यता दिल्यानंतर तातडीने डॉ. बाफना आणि डॉ. वरूण देवकाते यांनी हृदयशस्त्रक्रिया केली.
वास्तविक म्युकरची लागण झालेली असताना हृदयशस्त्रक्रिया करणे जोखमीचे असते. परंतु डॉ. बाफना आणि डॉ. देवकाते यांनी आवश्यक दक्षता घेत अॅंन्जीयोप्लास्टी केली. तीन दिवसांमध्येच रुग्ण पूर्ववत हालचाली करू लागला. त्यानंतर या रुग्णाला पुन्हा म्युकर विभागाकडे पाठवण्यात आले. तेथेही दोन दिवसांनी म्युकरची शस्त्रक्रिया करण्यात आली. आता या रुग्णाच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा होत आहे.
कोट
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्यांसाठी सीपीआर हे मोठे वरदान आहे हे वारंवार स्पष्ट होत आहे. विविध विभागाच्या डॉक्टर्सनी योग्य समन्वयाच्या माध्यमातून म्युकर असलेल्या रुग्णावर हृदयशस्त्रक्रिया यशस्वी केली. ही सीपीआरसाठी अभिमानास्पद कामगिरी आहे.
३००६२०२१ कोल सीपीआर ०१