Kolhapur- अजित पवार यांचे ‘उत्तरदायित्व’, रस्ते अडवून का? नागरिकांमधून विचारला जातोय प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 12:49 PM2023-09-07T12:49:55+5:302023-09-07T12:52:21+5:30

वाहतुकीत अडथळे कशासाठी

Successful preparations for Ajit Pawar meeting, Welcome arches erected in Kolhapur | Kolhapur- अजित पवार यांचे ‘उत्तरदायित्व’, रस्ते अडवून का? नागरिकांमधून विचारला जातोय प्रश्न

Kolhapur- अजित पवार यांचे ‘उत्तरदायित्व’, रस्ते अडवून का? नागरिकांमधून विचारला जातोय प्रश्न

googlenewsNext

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रविवारी तपोवन मैदानावर होणाऱ्या ‘उत्तरदायित्व’ सभेची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. कळंबा रोडवरील आयटीआयपासूनच स्वागत कमानी उभारल्या जात आहेत. रस्त्याच्या दुतर्फा पूर्णपणे बंद केले जाणार आहे. त्यामुळे त्यांचे उत्तरदायित्व रस्ते अडवून कशासाठी, असा प्रश्न त्या परिसरातील लोकांकडून विचारला जात आहे.

लोकमतकडे त्यासंबंधीच्या तक्रारी लोकांनी फोन करून केल्या. हा कोल्हापूर-गारगोटी राज्य महामार्ग आहे. त्यामुळे वाहनांची सतत वर्दळ असते. असे असताना मोठमोठ्या कमानी उभारून वाहतुकीत अडथळे कशासाठी, अशी लोकांची विचारणा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात सभेचा झंजावात सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटानेही महाराष्ट्रात सभा घेण्यास सुरुवात केली असून बीडमध्ये त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते.

कोल्हापुरात अजित पवार यांचा नागरी सत्कार व ‘उत्तरदायित्व’ सभेचे आयोजन रविवारी दुपारी चार वाजता तपोवन मैदानावर केले आहे. त्याची तयारी गेली आठ दिवस तालुकापातळीवर सुरू आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे कागलसह इतर तालुक्यांत सभा घेत आहेत. जिल्हाभर स्वागताचे डिजिटल फलक लावले असून त्यातून वातावरण निर्मिती केली जात आहे.

लाखाची गर्दी, नाश्ता, जेवणही

सभेला एक लाखाची गर्दी जमवण्याचा प्रयत्न संयोजकांकडून आहे. त्यादृष्टीने तालुक्यांतील नेत्यांवर जबाबदारी दिली असून गाड्यांसह नाश्ता, जेवणाचीही सोय केली आहे. ॲल्युमिनियमचा सांगाडा असलेला मंडप उभारण्यात येत आहे. शासन आपल्या दारी मेळाव्यालाही एक कोटी खर्चून असाच मंडप उभारण्यात आला होता.

ताराराणी चौकातून मिरवणूक

उपमुख्यमंत्री पवार यांची ताराराणी चौकातून मिरवणूक काढली जाणार आहे. ही मिरवणूक दसरा चौक व शाहू समाधिस्थळाला भेट देऊन अभिवादन केल्यानंतर छत्रपती शिवाजी पुतळा, अंबाबाई दर्शन करून बिंदू चौक, मिरजकर तिकटीमार्गे तपोवन मैदानाकडे मिरवणूक जाणार आहे.
 

Web Title: Successful preparations for Ajit Pawar meeting, Welcome arches erected in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.