सावकारांवर गुन्हे दाखल करून मोक्का लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 07:21 PM2019-11-05T19:21:01+5:302019-11-05T19:24:15+5:30
जिल्ह्यात छुप्या आणि उघड मार्गाने सावकारकी करणाऱ्यांना ठोका, त्यांच्यावर मोक्काचा गुन्हा दाखल करून, त्यांचा बीमोड करा, असे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना मंगळवारी दिले; त्यामुळे जिल्ह्यातील अनेक सावकारांचे आता १२ वाजणार आहेत.
कोल्हापूर : खासगी सावकारकीतून अनेक गोरगरीब कुटुंबीयांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर प्रकारही सावकारकीच्या माध्यमातून होत आहेत. सावकारांच्या त्रासाला कंटाळून अनेकजण आत्महत्या करीत आहेत. जिल्ह्यात सावकारकीचे पेव वाढत आहे. जिल्ह्यात छुप्या आणि उघड मार्गाने सावकारकी करणाऱ्यांना ठोका, त्यांच्यावर मोक्काचा गुन्हा दाखल करून, त्यांचा बीमोड करा, असे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना मंगळवारी दिले; त्यामुळे जिल्ह्यातील अनेक सावकारांचे आता १२ वाजणार आहेत.
पोलीस मुख्यालयात मंगळवारी क्राइम बैठक आयोजित केली होती. यावेळी अधिकाºयांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांमध्ये खासगी सावकारांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले; परंतु अद्यापही पूर्णत: या व्यवसायाचा बिमोड करता आलेला नाही; त्यामुळे गल्ली-बोळांत सावकारांचे पेव फुटले आहे.
कर्जाच्या व्याजापोटी सावकार टोकाची भूमिका घेऊ लागले आहेत. त्यातून अनेक सर्वसामान्य लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्यांच्यामुळे गुंडगिरी आणि अवैध व्यवसायांना बळ मिळत आहे. खासगी सावकारांविरोधात तक्रार आल्यास त्यांच्यावर थेट मोक्काचा गुन्हा दाखल करा, पोलिसी खाक्या दाखवून त्यांची सावकारकी उतरवा.
जिल्ह्यातून पूर्णपणे खासगी सावकारकी हद्दपार झाली पाहिजे; त्यासाठी कठोर पावले उचला, असे आदेश दिले. विधानसभा निवडणुकीमुळे गुन्हे उघडकीस आणण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रलंबित गुन्हे तत्काळ मार्गी लावा. जिल्ह्यात घरफोडी, लूटमारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. विशेषत: करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वाढते प्रकार आहेत.
हे गुन्हे रोखण्यासाठी विशेष लक्ष द्या. जिल्ह्यात आणखी काही गँगवार टोळ्या आहेत. त्यांच्याविरोधात मोक्काचा प्रस्ताव पाठवा, असे आदेश दिले. यावेळी महिन्याभरात चांगले काम करणाºया पोलीस ठाणे व अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, श्रीनिवास घाटगे, शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, करवीरचे डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते.
शांततेचे आवाहन
रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद खटल्यावर सर्वोच्च न्यायालय कोणत्याही क्षणी निकाल देण्याची शक्यता आहे. हा निर्णय कोणत्या धर्माविरूद्ध, राजकीय पक्षाचा विजय नाही. तो न्यायिक निर्णय आहे, तो सर्वांनी मान्य करून शांतता राखावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, मशीद, प्रार्थना स्थळे, बसस्थानके, मोहल्ले, आदी ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त ठेवून सतर्क राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. नाकाबंदीसह वाहनांच्या तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
निर्भयपणे तक्रार द्या
जिल्ह्यात खासगी सावकारकीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत चालला आहे. या सावकारांकडून गोरगरिबांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या अवैध प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन करून सावकारांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून निर्माण केलेले भय संपुष्टात आणण्यासाठी त्यांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. नागरिकांनी तक्रार देताच सावकारांवर गुन्हे दाखल करून त्यांना खाकीचा दंडुका पडेल; त्यासाठी कसलीही भीती न घेता नागरिकांनो तक्रार द्या, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी केले आहे.