शनिवारपासून पुण्यात होणार साखर परिषद
By admin | Published: April 22, 2015 12:40 AM2015-04-22T00:40:22+5:302015-04-22T00:53:53+5:30
मान्यवरांचा सहभाग : आगामी दहा वर्षांचे नियोजन
कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर उद्योगाचे वर्तमान व भवितव्य यासंबंधीची सखोल चर्चा करून पुढील दहा वर्षांचे नियोजन करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने पुण्यात २५ व २६ एप्रिलला साखर परिषद होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व माजी केंद्रीय कृषिमंत्री व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद होणार आहे.
मांजरी बुद्रुक येथील व्हीएसआयच्या सभागृहात ही परिषद होणार असल्याची माहिती साखर आयुक्तांनी दिली आहे.
परिषदेला राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, मुख्य रसायन तज्ज्ञ, शेतीविभागाचे प्रमुख, मुख्य लेखापाल, आसवनी प्रमुख हे उपस्थित राहणार आहेत. परिषदेसाठी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे उपस्थित राहणार आहेत.