संडे मुलाखत - विश्वास पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:23 AM2021-05-23T04:23:29+5:302021-05-23T04:23:29+5:30
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तांतर करण्यात अनेकांचे प्रयत्न कामी आले असले तरी संपूर्ण निवडणुकीत ज्यांची ‘चाणक्य नीती’ यशस्वी ...
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तांतर करण्यात अनेकांचे प्रयत्न कामी आले असले तरी संपूर्ण निवडणुकीत ज्यांची ‘चाणक्य नीती’ यशस्वी ठरली ते विश्वास नारायण पाटील यांना तिसऱ्यांदा ‘गोकुळ’चे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. गेली ३५ वर्षे ते ‘गोकुळ’मध्ये कार्यरत असून, दूध व्यवसायात त्यांचा दांडगा अभ्यास आहे. आव्हानात्मक काळात नेतृत्वांनी त्यांच्यावर दाखवलेला ‘विश्वास’ सार्थ करण्यासाठी त्यांनी ॲक्शन प्लॅन तयार केला. त्याविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद.....
प्रश्न : आतापर्यंत अध्यक्षपदाच्या काळात आपण नाविन्यपूर्ण योजना राबवल्या?
उत्तर : खरे आहे, अध्यक्षपदाच्या पहिल्या २००४-०६ कालावधीत वासरु संगोपन योजना सुरू केली. लाखो रुपये किमतीची जनावरे खरेदी करण्यापेक्षा जातीवंत जनावर आपल्या गोठ्यात तयार करण्याची सवय शेतकऱ्यांना लागली आहे. आज जे १३ लाख लिटर दूध दिसते, हे त्याचेच फलित आहे. दुसऱ्या अध्यक्ष पदाच्या २०१५-१८ कालावधीत संघाचा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये पशुखाद्य कारखाना सुरू करून दर्जेदार खाद्य दिले.
प्रश्न : आता काही नवीन योजना आहेत का?
उत्तर : आगामी काळात अनेक योजना राबवायच्या आहेत. आमचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी उत्पादकांना दोन रुपये दर जादा देण्याचे अभिवचन दिले आहे. त्याची पूर्तता करणार आहेच, त्यासाठी काटकसरीची भूमिका आम्ही घेतली आहे. वाहतूक खर्च कमी करणे, कर्मचाऱ्यांचा वापर पूर्ण क्षमतेने करायचा आहे. गेली पंधरा महिने कोविडमुळे बंदसदृश परिस्थिती आहे. त्याचा परिणाम दूध विक्रीवर झाला असून, विक्रीबरोबरच दूध उत्पादनवाढीकडे आम्हाला लक्ष द्यावे लागणार आहे.
प्रश्न : कर्मचाऱ्यांच्या बदल्या, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कमी केले आहे?
उत्तर : आम्ही राजकारण डोक्यात ठेवून काहीही करत नाही. काही कर्मचारी आता कामावर येऊ लागल्याने दूध संकलनाच्या ठिकाणी उभे रहायला जागा नाही. कर्मचाऱ्यांचा पूर्ण क्षमतेने वापर करून घेण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागत आहेत.
प्रश्न : दूध उत्पादनवाढीसाठी नेमके नियोजन कसे आहे?
उत्तर : गायीचे दूध भरपूर आहे. आता म्हैस दूधवाढीसाठी प्रयत्न करणार आहे. परराज्यातून जातीवंत म्हैस खरेदीसाठी आता ‘गोकुळ’ २५ हजार रुपये अनुदान देत आहे. हे अनुदान सुुुरूच राहील, त्याशिवाय आण्णासाहेब पाटील महामंडळाकडून म्हैस खरेदी व गोठ्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. परतफेडीची हमी ‘गोकुळ’ घेणार असल्याने बँकांही तयार आहेत.
प्रश्न : दूध विक्री वाढवण्यासाठी काय करणार आहात?
उत्तर : पुणे, मुंबई येथे अनेक वर्षांपासून तेच वितरक असल्याने दूध विक्री वाढीव मर्यादा येत आहेत. तिथे जादा वितरक नेमणार आहे. पुणे व मुंबईच्या मध्यभागी दहा लाख लिटर क्षमतेचे पॅकींग सेंटर उभे करायचे आहे. सध्या मुंबईत संघाच्या मालकीच्या जागेत चार लाख लिटरच पॅकींग होते. भाड्याच्या जागेला लिटरला १ रुपये ६० पैसे भाडे व त्यावर ५ टक्के जीएसटी द्यावी लागते. येथे संघाला मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
उपपदार्थ उत्पादनाला प्राधान्य
आम्ही आतापर्यंत उपपदार्थाकडे दुर्लक्ष केले; मात्र आता त्यालाही प्राधान्य देणार आहे. दूध प्रकल्पाचे राज्य शासनाकडे २५ कोटी अनुदान पडून आहे. आमचे दोन्ही नेते खमके असल्याने आता हा प्रश्न फार दिवस राहणार नाही.
निरोगी जनावरांची संकल्पना
जनावरांनासारखी औषधे वापरणे चांगले नाही. त्याचा दुधाच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. मुळात जनावरेच निरोगी कसे राहतील, यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधनासह आणखी काय करता येईल, याचा अभ्यास सुरू आहे.
कोट-
स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांनी आयुष्यभर सामान्य दूध उत्पादकाचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमची वाटचाल सुरू आहे.
- विश्वास पाटील (अध्यक्ष, गोकुळ)