उदगाव : उदगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तब्बल ७९ जणांनी शड्डू ठोकला आहे. सतरा सदस्यांपैकी ‘स्वाभिमानी’ची एक जागा बिनविरोध झाल्याने स्वाभिमानीमध्ये आनंदाचे वातावरण आहे; परंतु प्रत्येक प्रभागात एकेका जागेसाठी चार ते पाच जणांनी अर्ज भरल्याने स्वाभिमानीनेही आता सावध भूमिका घेतली आहे तर आघाडीकडून सुकाणू समितीने प्रत्येक प्रभागांत चाचपणी पूर्ण केली आहे. इलेक्टिव्ह मेरिट असणाऱ्या उमेदवारांना संधी देणार असल्याचे दोन्हीही पॅनेल प्रमुखांचे म्हणणे आहे.
-------------
बुबनाळ ‘बिनविरोध’साठी उमेदवारांना साकडे
बुबनाळ : सलग दोनवेळा बिनविरोध झालेल्या येथील ग्रामपंचायतीची निवडणूक यंदाही बिनविरोध होणार का, अशी चर्चा असतानाच अकरा जागांसाठी ५३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बिनविरोध ग्रामपंचायत करणाऱ्या गावांना आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पन्नास लाखांचा निधी देऊ, अशी घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर गावातील संभाव्य अकरा उमेदवारांची यादी जाहीर करून अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करावी आणि पन्नास लाखांचे बक्षीस मिळविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन एका आघाडीकडून करण्यात आले आहे.
------------------
गावपुढाऱ्यांकडून आश्वासनांचे गाजर
शिरोळ : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले असतानाच तालुक्यात नामनिर्देशन अर्ज हे एकूण जागेपेक्षा तिप्पटीने आल्याने गोंधळ उडाला आहे. पॅनेलप्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे. अपक्षांचा फटका आपल्या पॅनेलला बसेल या भीतीने गावपुढाऱ्यांकडून मनधरणी आणि आश्वासनांचे गाजर असे चित्र पाहावयास मिळाले. विविध प्रकारची आश्वासने इच्छुकांना मिळू लागली आहेत. त्यामुळे गावातील राजकीय वातावरण आणखीन गरम झाले आहे.