जनसामान्यांचा आधारवड : शंकरराव पाटील (दादा)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:25 AM2021-02-24T04:25:53+5:302021-02-24T04:25:53+5:30

शंकरराव आत्माराम पाटील यांचा जन्म २७ जानेवारी १९४२ रोजी झाला. वडील आत्माराम दादोजी पाटील (दिवाणजी) यांच्याकडून त्यांना सामाजिक ...

Support for the masses: Shankarrao Patil (Dada) | जनसामान्यांचा आधारवड : शंकरराव पाटील (दादा)

जनसामान्यांचा आधारवड : शंकरराव पाटील (दादा)

googlenewsNext

शंकरराव आत्माराम पाटील यांचा जन्म २७ जानेवारी १९४२ रोजी झाला. वडील आत्माराम दादोजी पाटील (दिवाणजी) यांच्याकडून त्यांना सामाजिक व राजकीय कार्याचा वसा प्राप्त झाला. यमगे गावच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय जडणघडणीमध्ये सुरुवातीपासून आजपर्यंत ‘सरनोबत’ परिवाराचे मोलाचे कार्य आहे. या परिवाराचे सदस्य असलेले शंकरराव पाटील यांनी यमगे गावच्या सरपंच स्तरावरून बिद्री कारखान्याचे संचालक व आर. बी. पाटील सहकारी खत कारखान्याचे संचालक ते चेअरमन असा राजकीय ठसा निर्माण केला होता. शंकरराव पाटील हे कै. हिंदुराव बळवंत पाटील यांचे एकनिष्ठ व खंदे समर्थक होते. कै. हिंदुराव पाटील यांची बिद्री सहकारी साखर कारखान्यातील सत्ता गेल्यानंतर शंकरराव पाटील यांना अनेक वेळा राजकीय प्रलोभने देऊन हिंदुराव पाटील यांच्यापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण शंकरराव पाटील यांनी कै. हिंदुराव पाटील यांची साथ कधीही सोडली नाही. हिंदुराव पाटील यांच्या पश्चात शंकररावजी पाटील यांनी बाबासाहेब पाटील यांचे नेतृत्व मान्य करून एका सच्चा कार्यकर्त्याची आपल्या नेत्यावरील दृढ व निस्सीम निष्ठा शेवटपर्यंत दाखवून दिली.

राजकारणाबरोबर त्यांना शेती व क्रीडा क्षेत्राचीही विशेष आवड होती. कितीही महत्त्वाचे काम असले तरी शेतीची फेरी मारूनच आपल्या दिनक्रमाला सुरुवात करीत. शेतीबरोबरच खेळाचीही त्यांना विशेष आवड होती. त्यामध्ये कबड्डी या खेळाची विशेष आवड असल्याने गावामध्ये विक्रमसिंह तरुण मंडळ स्थापन करून त्याच्या माध्यमातून अनेक वर्षे कबड्डी स्पर्धेचेही आयोजन ते करीत होते.

त्यांचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण गावातीलच प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतरचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण ना. पा. हायस्कूल कोल्हापूर येथे झाले. याच काळात त्यांनी ना. पा. हायस्कूलचे जीएस पददेखील भूषविले होते. राजकीय जीवनामध्ये मार्गक्रमण करीत असताना शंकरराव पाटील यांनी १९६८ ते १९७२ व १९७८ ते १९८३ अशी १० वर्षे यमगे गावचे सरपंचपद भूषविले. तसेच सलग २५ वर्षे ते सदस्य होते. १९८५ साली त्यांनी अंबामाता सहकारी पाणीपुरवठा संस्था स्थापन करून शेतीविषयक पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे दूधगंगा, वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्रीचे पाच वर्षे संचालकपद देखील भूषविले होते. तर आर. बी. पाटील खत कारखाना कोल्हापूर या संस्थेचे ते २५ वर्षे संचालक व काही वर्षे चेअरमनदेखील होते. दोन वेळा त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक देखील लढविली होती.

सामाजिक जीवनामध्ये लोकसेवेचा वसा घेऊन त्यांनी दुर्गामाता दूध संस्थेची स्थापना केली. त्याचप्रमाणे लोकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, या सामाजिक बांधिलकीतून त्यांनी दादोजीराव पाटील वाचनालयाची सुरुवात केली. १९८१ मध्ये गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नळपाणी योजना सुरू केली. गावचे ग्रामदैवत अंबामाता मंदिर व विठ्ठल मंदिर त्याचप्रमाणे हनुमान मंदिर यांच्या जीर्णोद्धारामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच गावामध्ये अध्यात्मिक प्रबोधनासाठी त्यांनी विठ्ठल मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करून हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली. गावातील मुलामुलींना हायस्कूलचे शिक्षण गावातच मिळावे यासाठी त्यांनी जय महाराष्ट्र हायस्कूल स्थापनेसाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

.........

शिवाजीराव पाटील, माजी सरपंच, यमगे.

................

मित्रपरिवार : माजी आमदार व दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील, माजी आमदार कै. आर. बी. पाटील, कै. जी. डी. पाटील, कै. मारुतीराव खाडे, माजी आमदार भरमू आण्णा पाटील

Web Title: Support for the masses: Shankarrao Patil (Dada)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.