महाराष्ट्रातील गोरगरिबांचे आधारवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:24 AM2021-04-20T04:24:36+5:302021-04-20T04:24:36+5:30
दत्तात्रय पाटील, म्हाकवे कोरोनापासून बचावासाठी जसे सर्वत्र लसीकरण सुरू आहे. त्याचप्रमाणे गोरगरीब, कष्टकरी कामगार वर्ग जनसामान्यांच्या जीवनात चैतन्य यावे ...
दत्तात्रय पाटील, म्हाकवे
कोरोनापासून बचावासाठी जसे सर्वत्र लसीकरण सुरू आहे. त्याचप्रमाणे गोरगरीब, कष्टकरी कामगार वर्ग जनसामान्यांच्या जीवनात चैतन्य यावे यासाठी मंत्री हसन मुश्रीफ हे हयातभर अगदी वंगणाप्रमाणे कार्यरत आहेत. म्हणूनच त्यांच्या पाठीवर गोरगरीब, कष्टकरी, जनसामान्यांचे कवच आहे. अशा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने केलेला लेखनप्रपंच...
पूर्वी बैलगाडीच्या चाकांच्या कण्यांना वंगण (तेल) घातले जात. यामुळे बैलगाडी सुसाट वेगाने धावत होती. अगदी त्याचप्रमाणे ना. मुश्रीफ यांचे कार्य जनसामान्यांना आधार देणारे ठरले आहे.
मुश्रीफ हे आयुष्यभर गोरगरीब, दीनदलित जनता हीच आपली ताकद तीच आपली कवचकुंडले मानून सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले. कामगारमंत्री असताना जे कामगार ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता दुसऱ्याला निवारा मिळावा यासाठी धडपडतात. त्या बांधकाम कामगारांना मात्र, आजारी पडल्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेता येत नाहीत. त्यामुळे या कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्यांना शासनदरबारी नोंदीत केले. त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी कवचकुंडले ठरणारी मेडिक्लेम योजना अंमलात आणली. तसेच, त्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीची योजना यासह तब्बल २४ योजना अंमलात आणल्या. तसेच, निराधार कुटुंबांना पेंन्शनचा आधार, रुग्णांसाठी योजना यासह त्यांची अनेक कामे ही कम्युनिस्टांना शोभणारी आहेत. म्हणून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील जनता अगदी सहृदयीपणे लाल सलाम करते, हा त्यांच्या कार्यकतृत्वाचा गौरवच आहे.
गतवेळी कामगारमंत्री पदाचा पदभार आल्यानंतर मुश्रीफ यांनी नोंदणीकृत कामगारांच्या सर्व कुटुंबीयांना कवचकुंडले ठरेल अशी मेडिक्लेम योजना अमलात आणली. तसेच, महिला कामगारांसाठी प्रस्तुतीच्या कालावधीत पगारी रजा, त्यांना अनुदान तसेच, नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना पहिलीपासून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, साहित्य खरेदीसाठी अनुदान यासह विविध २४ योजेनांची अंमलबजावणी करण्यात ते यशस्वी झाले.
यासाठी कामगारांनीही प्रचंड संघर्ष केला असला तरी त्या संघर्षाला दाद देत योग्य निर्णय घेणे आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यामध्ये ना. मुश्रीफ यांचा हातखंडा असल्याची जाणीव कामगारांना आहे.
तसेच, विधी व न्यायमंत्रीपदाची धुरा मिळताच मुश्रीफ यांनी त्याचा सखोल अभ्यास केला. आणि पुणे, मुंबई येथे जे मोठमोठे दवाखाने आहेत. जे शासनाकडून मदत घेतात. त्या दवाखान्यांमध्ये १० टक्के गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा कायदा आहे. त्याचा आधार घेत मुश्रीफांनी कागलसह जिल्ह्यातील हजारो रुग्णांवर मोफत उपचार करून त्यांना सुखरूप घरी पोहचविले आहे. त्यामुळेच त्यांना राज्यभरात किंबहुना गोरगरिबांचा ‘महाडाॅक्टर’असा नामोल्लेख झाला.
त्याचबरोबर त्यांनी मंत्रीपदाच्या काळात निराधार विधवा, परित्यक्ता महिला तसेच वयोवृद्धांना संजय गांधी निराधार पेंन्शन योजनेचा लाभ मिळवून दिला. त्यामुळे त्यांना राज्यभर गोरगरीब वयोवृद्धांचा ‘श्रावणबाळ’ म्हणून ओळखले गेले.
तर आता ग्रामविकासमंत्रीपद मिळाल्यानंतर कागल मतदारसंघासह जिल्ह्यात कोट्यवधींचा निधी खेचून आणून गावागावात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. जिल्हा बँकेला संकटातून बाहेर काढत पूर्वपदावर आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी त्यावर तात्काळ उपाययोजना व्हाव्यात यासाठी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्याशी सातत्याने संपर्कात असतात.
दरम्यान, मुश्रीफ यांच्या अनुभवामुळे त्यांना कामगार मंत्रीपद मिळताच राज्यातील सर्वच क्षेत्रांतील कामगार वर्गात चैतन्य निर्माण झाले आहे. त्यांच्या काही मागण्यांची पूर्ती होईल, असा आशावादही कामगार वर्गाला वाटत आहे. जनतेचे हित डोळ्यांसमोर ठेवून राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत असणाऱ्या मुश्रीफ यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा...!