सिरसेतील विद्यार्थ्यांच्या पायाला अचानक फोड--सीपीआरमध्ये उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 01:21 AM2017-11-12T01:21:11+5:302017-11-12T01:22:16+5:30
आमजाई व्हरवडे : सिरसे (ता. राधानगरी) येथील पहिली ते सातवीच्या चाळीस विद्यार्थ्यांच्या पायाला अचानक फोड व चट्टे उठल्याने पालकांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
आमजाई व्हरवडे : सिरसे (ता. राधानगरी) येथील पहिली ते सातवीच्या चाळीस विद्यार्थ्यांच्या पायाला अचानक फोड व चट्टे उठल्याने पालकांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे फोड नेमके कशाचे आहेत, याबाबत तर्कवितर्क लढविले जात असून, सर्व विद्यार्थ्यांना कोल्हापुरातील सीपीआर व खासगी त्वचा रोगतज्ज्ञांकडे उपचारासाठी दाखल केले आहे.
माहिती अशी की, सिरसे येथे पहिली ते सातवीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत दोनशेच्या आसपास विद्यार्थी शिकतात. दोन दिवसांपूर्वी दोन ते तीन विद्यार्थ्यांच्या पायाला अचानक फोड उठले. कशाने तरी उठले असतील म्हणून पालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दुसºया दिवशी पुन्हा ३0 ते ३५ विद्यार्थ्यांच्या पायावर मोठमोठे फोड उठून रक्त साकाळू लागल्याने पालक घाबरले. सुरुवातीला गावातच उपचार केले. मात्र, हा प्रकार वाढतच गेला. हा प्रकार समजताच राधानगरीचे उपसभापती रवीश पाटील (कौलवकर) यांनी राधानगरीचे आरोग्य पथक घेऊनच सिरसे गाठले व उपचार सुरू केले. आरोग्य विभागाने याची चौकशी करून उपाययोजना करावी, अशी मागणी सरपंच सुभाष पाटील यांनी केली आहे.
रक्ताचे नमुने घेतले
विद्यार्थ्यांवर सीपीआर व खासगी त्वचारोग तज्ज्ञांकडे उपचार सरू आहेत. मातीच्या अॅलर्जीमुळे हा प्रकार घडल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली असली तरी विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने तपासणी अहवाल आल्यानंतरच कारण स्पष्ट होईल.