‘त्या’ शिक्षकांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:26 AM2017-08-24T00:26:58+5:302017-08-24T00:26:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
आजरा : प्रथम सत्र संपत आले तरी नेमणुका देऊनही तालुक्यात जे शिक्षक हजर झालेले नाहीत, अशा शिक्षकांवर कारवाईची मागणी आजरा पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांनी केली.
आजरा पंचायत समितीची मासिक सभा सभापती रचना होलम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. गटविकास अधिकारी एस. व्ही. केळकर यांनी स्वागत केले.
सभेमध्ये उपसभापती शिरीष देसाई यांनी आरोग्य ग्रामसभा घेण्यासंदर्भात सूचना केल्या. वीजवितरण कंपनीच्या मीटर्सचे डिस्प्ले गेल्याने अंदाजे बिल दिले जाते. वास्तविक, डिस्प्ले बदलण्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीची आहे. अंदाजे व सरासरी बिलांचा फटका ग्राहकांना बसत आहे, असे उदय पवार व उपसभापती शिरीष देसाई यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई मार्गावर जादा बसफेºया सोडण्यात येत असल्याचे आगारप्रमुख शिवराज जाधव यांनी सांगितले. लाकूडवाडी येथील धोकादायक डी.पी. बदलण्याची सूचना सभापती रचना होलम यांनी केली. चित्री प्रकल्पामध्ये ९५ टक्के, तर खानापूर धरणामध्ये ९२ टक्के पाणीसाठा असून, गतवर्षीच्या तुलनेत आजअखेर ५०० मि.मी. पाऊस कमी झाल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. लघुसिंचन विभागाने सोहाळे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयाची अग्रक्रमाने दुरुस्ती करण्याबाबत उदय पवार यांनी सूचना केल्या. शिक्षण विभागात शिपायांसह अपुरा अधिकारी व कर्मचारी वर्ग नसल्याचे गटशिक्षणाधिकारी मोळे यांनी सांगितले.
६ सप्टेंबरला आजरा तालुक्याची आढावा बैठक घेण्यात येणार असून, बैठकीस जि.प.चे अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. चर्चेत सहायक गटशिक्षण अधिकारी शरद भोसले, सदस्या वर्षा कांबळे, उदय पवार, आदींनी भाग घेतला. सभेस सदस्यांसह अधिकारी उपस्थित होते.
साहेब काय सांगू
वनविभागाचा आढावा घेण्याकरिता परिक्षेत्र वनअधिकारी उपस्थित राहू न शकल्याने सभेकरिता आलेल्या वनपालांनी साहेब मी काय सांगू? असा प्रश्न सदस्यांना उपस्थित केल्याने सभागृहात हशा पिकला. यावर उपसभापती शिरीष देसाई यांनी नाव सांगा आणि बसा, असा मिश्कील सल्ला दिला.