बाजीराव जठार वाघापूर : महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता.भुदरगड) येथे सद्गुरू बाळूमामांच्या भंडारा यात्रेत शनिवार (दि. ६)रोजी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा महाप्रसाद तयार करण्यासाठी ११ टन तांदूळ, ५ टन गहू व ४ टन गूळ, डाळी, अशा एकूण २० टन धान्यांचा वापर करण्यात आला. देवस्थान प्रशासनाने एकूण तेरा काहिलीचा प्रसाद तयार केला होता.
प्रारंभी मानकरी कर्णसिंह भोसले, कृष्णात डोणे यांच्या हस्ते महाप्रसादावर भंडारा व दूध अर्पण करण्यात आले. त्यानंतर महाप्रसाद सुरू करण्यात आला. महाप्रसाद घेण्यासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. प्रसाद वाटपाचे आणि घेण्याचे नियोजन उत्तम रीतीने केल्यामुळे सर्वांना योग्य पद्धतीने प्रसादाचा लाभ घेता आला. उन्हापासून भक्तांना त्रास होऊ नये, यासाठी भव्य मंडप घालण्यात आला होता. प्रसादासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भक्तांना प्रसाद घरी नेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात आली होती. स्वतंत्र दोन काहीली ठेवून भांड्यामध्ये घरी नेण्यासाठी प्रसाद दिला जात होता. संध्याकाळी उशिरापर्यंत महाप्रसाद चालू होता.
बिद्री साखर कारखाना,हमीदवाडा साखर कारखाना, गोकुळ दुध संघ व स्वयंसेवी संस्था व आदमापूर गावातील व भागातील ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. तर मुरगूड नगरपालिका यांचेकडून फिरत्या शौचालयाची व्यवस्था केली होती.स्वयंसेवकांनी केलेल्या उत्कृष्ट प्रसाद वाटपामुळे गोंधळ झाला नाही.
तहसीलदार अर्चना पाटील, भुदरगड पोलिस निरीक्षक सचिन पाटील,गटविकास अधिकारी शेखर जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्धन, आरटीओ स्नेहा देसाई,ग्रामसेवक बोंगार्डे, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुख डी.एस.मिरजकर,भुदरगड एस.टी.आगार प्रमुख प्रशांत नाईक ,राधानगरी आगाराचे विकास वर्णे,देवस्थान प्रशासकीय समिती सदस्य रागिणी खडके, शिवराज नायकवडी, ग्रामस्थ यांच्या नेटक्या नियोजनामुळे प्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पडला.