तलाठी बाहेर पडले शासकीय ‘व्हॉटस् अॅप’ ग्रुपमधून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 12:37 PM2019-11-06T12:37:03+5:302019-11-06T12:41:56+5:30
कामाव्यतिरिक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास दिला, याच्या निषेधार्थ तलाठ्यांनी सर्व शासकीय व्हॉट्स अॅप ग्रुपवरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा तलाठी संघाने सोमवारी (दि. ४) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले.
कोल्हापूर : रात्री अपरात्री कधीही व्हॉटस् अॅपवरून संदेश पाठवून तलाठ्यांना शासकीय कामांसाठी बोलवून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. आपत्ती किंवा निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त अशा पद्धतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास दिला आहे. याच्या निषेधार्थ तलाठ्यांनी सर्व शासकीय व्हॉट्स अॅप ग्रुपवरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा तलाठी संघाने सोमवारी (दि. ४) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाकडून तलाठी संवर्गाच्या मागण्यांची पूर्तता करण्यास होणारे दुर्लक्ष आणि वरिष्ठ अधिकाºयांकडून कामासाठी येणारा दबाव लक्षात घेता, सर्व शासकीय कार्यालयांनी ‘व्हॉटस् अॅप’ गु्रपमधून बाहेर पडण्याचा निर्णय २३ आॅगस्टला महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने घेतला.
यात शासकीय सुट्टीदिवशी नैसर्गिक आपत्ती व निवडणूक काम हे अपवाद होते; परंतु आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यातील महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत या निर्णयाला तलाठी संघाकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.
त्यानंतरही पूरग्रस्तांना अनुदान वाटप व विधानसभा निवडणुकीच्या कामामध्ये समन्वय राहावा, या उद्देशाने निवडणुकीची आचारसंहिता संपेपर्यंत निर्णय लांबणीवर टाकला होता; परंतु आता जिल्ह्यातील सर्व तलाठी व्हॉटस् अॅप ग्रुपमधून बाहेर पडत आहेत.
त्याचबरोबर आॅनलाईन सातबारा प्रकल्पातील पायाभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. रिक्त पदांची भरती रेंगाळल्याने तलाठ्यांवर अतिरिक्त पदभार पडत आहे. तलाठी सज्जा पुनर्रचना निर्णयाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे, आदी मागण्यांकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष धनाजी कलिकते, सरचिटणीस अनंत दांडेकर, बी. एस. खोत, अजित बेलवेकर, संजय सुतार, चंद्रकांत म्हसवेकर, एकनाथ शिंदे, आदींचा समावेश होता.