शिक्षक, पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 11:40 AM2020-11-30T11:40:17+5:302020-11-30T11:42:16+5:30
Vidhan Parishad Election , pune, teachr, kolhapurnews पुणे शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गेल्या २५ दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मेळावे, प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर दिला. या दोन्ही मतदारसंघांसाठी एकूण ९८ उमेदवार रिंगणात असून, त्यांचे भवितव्य उद्या, मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतपेटीमध्ये बंद होणार आहे.
कोल्हापूर : पुणेशिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गेल्या २५ दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मेळावे, प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर दिला. या दोन्ही मतदारसंघांसाठी एकूण ९८ उमेदवार रिंगणात असून, त्यांचे भवितव्य उद्या, मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतपेटीमध्ये बंद होणार आहे.
शिक्षक मतदारसंघातून ३५, तर पदवीधर मतदारसंघामधून ६३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या दोन्ही मतदारसंघांतून विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत, महाविकास आघाडीचे प्रा. जयंत आसगावकर आणि अरुण लाड, भाजपचे संग्राम देशमुख, राज्य शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार, इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे, रेखा पाटील, आदींचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी दि. ५ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली.
अर्ज भरल्यापासून प्रचाराची सुरुवात झाली. मात्र, अर्जमाघारीची प्रक्रिया झाल्यानंतर प्रचाराचा वेग वाढला. मेळावे, वैयक्तिक गाठीभेटी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार रंगला. महाविकास आघाडीने त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे विभागात शहर, गावांमध्ये मेळावे घेतले. भाजपने प्रचारात बैठकांवर भर दिला. सर्वच उमेदवारांनी वैयक्तिक गाठीभेटींवर जोर दिला.
आरोप-प्रत्यारोपांनी प्रचार रंगला. वचननाम्यांतून शिक्षक, पदवीधरांचे प्रश्न सोडविण्याचे व्हिजन उमेदवारांनी मांडले. या प्रचाराची रविवारी सायंकाळी पाच वाजता सांगता झाली. उद्या, मंगळवारी मतदान होईल. त्यानंतर गुरुवारी (दि. ३ डिसेंबर) पुणे येथील विभागीय कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
मतदान केंद्राच्या माहितीचे संदेश
प्रचारात एसएमएस आणि सोशल मीडियावर संदेश पाठवून उमेदवारांनी मतदारांना मतदानासाठी आवाहन केले. शनिवार (दि. २८) पासून या उमेदवारांकडून मतदान केंद्रांची माहिती देणारे संदेश मतदारांच्या मोबाईलवर पाठविण्यात येऊ लागले. रविवारी या संदेशांची संख्या वाढली.
शिवाजी विद्यापीठात प्रचार रंगला
शिवाजी विद्यापीठातील शिक्षक हे पदवीधर आणि शिक्षक, तर कर्मचारी हे पदवीधर निवडणुकीसाठीचे उमेदवार आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी विद्यापीठात प्रचार करण्यावर भर दिला. त्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आमदार चंद्रकांत जाधव, अधिसभा सदस्य भैया माने यांनी, तर भाजपच्या उमेदवारांसाठी माजी आमदार भगवान साळुंखे, ह्यअभाविपह्णचे शंकरराव कुलकर्णी यांनी शिक्षक, कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या.