खड्डे पडलेल्या रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 12:12 PM2019-11-05T12:12:08+5:302019-11-05T12:14:16+5:30
अतिवृष्टी आणि महापुरामुळे शहरातील रस्ते खराब झाले आहेत. महापालिका प्रशासनावर सर्वच थरातून ताशेरे ओढले जात आहेत. परिणामी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने करून घेण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिले होते. यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले असून, सोमवार (दि. ४)पासून अखेर पॅचवर्कच्या कामाला मुहूर्त मिळाला आहे.
कोल्हापूर : अतिवृष्टी आणि महापुरामुळे शहरातील रस्ते खराब झाले आहेत. महापालिका प्रशासनावर सर्वच थरातून ताशेरे ओढले जात आहेत. परिणामी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने करून घेण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिले होते. यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले असून, सोमवार (दि. ४)पासून अखेर पॅचवर्कच्या कामाला मुहूर्त मिळाला आहे.
शहरामध्ये असा कोणताही चौक नाही की तेथे खड्डे नाहीत. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना वाहने चालविणे सोडाच, चालणेही जिकिरीचे झाले आहे. विविध पक्ष, संघटनांकडून महापालिकेला धारेवर धरण्यात येत आहे.
यानंतर आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी तातडीची बैठक घेऊन रस्ते त्वरित पॅचवर्क करण्याचे आदेश दिले. सोमवारी विभाग प्रमुखांच्या बैठकीमध्येही आयुक्तांनी खराब रस्त्यांवरून अधिकाऱ्यांची खरडपट्टी केल्याचे समजते. यामुळे दुपारनंतर सर्व यंत्रणा कामाला लागली.
पॅचवर्कचे काम सुरू केलेले रस्ते
- बिंदू चौक ते अयोध्या टॉकीज
- संभाजीनगर ते नंगीवली तालीम
- उमा टॉकीज परिसर
- धैर्यप्रसाद कार्यालय ते पितळी गणपती मंदिर
मुदतीपूर्वी खराब झालेल्या रस्त्यांचे गुरुवारपासून पॅचवर्क
सततच्या पावसामुळे पॅचवर्कचे काम रखडले होते. बहुतांशी रस्ते ठेकेदाराला दिलेल्या मुदतीपूर्वीच खराब झाले आहेत. संबंधित ठेकेदारांना समज दिली असून, तातडीने रस्ते दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारे १८ प्रमुख रस्ते खराब झाले असून, गुरुवार (दि. ७)पासून त्यांचे पॅचवर्क करण्यास सुरू होणार आहे.
- नेत्रदीप सरनोबत,
शहर अभियंता
पॅचवर्क नको, नव्याने रस्ते करण्याची गरज
शहरामध्ये आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये महापूर आला. यामुळे रस्ते खराब झाले. महापालिकेने सध्या पॅचवर्क केले जात आहे. मात्र, काही दिवसाने पुन्हा रस्ते खराब होणार आहेत. तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा नवीनच रस्ते करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहेत.
केंद्र, राज्य शासन आता तरी कोल्हापूरकडे लक्ष देणार काय
महापुरामुळे महापालिकेच्या मालमत्तेचे सुमारे ४०० कोटींचे नुकसान झाले आहे. यामध्ये रस्त्यांचाही समावेश आहे. शासनाकडून निधी मिळण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीमध्ये आश्वासनांची खैरात करण्यात आली. त्यामुळे शासनाने आता तरी कोल्हापूरच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे