Kolhapur: राऊतवाडी धबधबा पाहण्यास मोजावे लागणार पैसे, हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर करडी नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 02:26 PM2023-07-04T14:26:56+5:302023-07-04T14:27:19+5:30
माफक प्रवेश शुल्क मोजावे लागले तरी सुविधा उपलब्ध झाल्याने महिलांना धबधब्याचा आनंद घेता येणार
राधानगरी : राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक राधानगरी तालुक्यातील राऊतवाडीला भेट देत आहेत. तालुक्यातील खास आकर्षण असणाऱ्या राऊतवाडी धबधबा येथे आमदार प्रकाश आबिटकर व वन्यजीव विभागाच्या प्रयत्नांतून पर्यटन विकास निधीतून स्वागत कमान, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम, स्वछतागृह, वनकर्मचारी व पोलिसांसाठी चौकी, संरक्षक कठडा आदी विकासकामे केली आहेत. त्यामुळे या वर्षी प्रथमच धबधबा पाहण्यासाठी माफक प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.
ग्राम परिस्थिती विकास समितीमार्फत लहान मुलांना पाच रुपये व महिला व पुरुष यांना दहा रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. या मिळालेल्या निधीतून धबधबा परिसर स्वच्छता, प्लास्टिक व इतर कचरा गोळा करणे, दुरुस्ती व देखभाल, स्वच्छतागृहात विजेची सोय, ग्राम परिस्थिती विकास समितीच्या वतीने नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार आदींचा समावेश असणार आहे. तसेच पार्किंगसाठी मोटारसायकल १० रुपये व चारचाकी वाहनास २० रुपये आकारण्यात आले आहेत.
धबधबा ठिकाणी अनेक तरुणांकडून हुल्लडबाजी केली जाते. पण, आता वनकर्मचारी तसेच पोलिस चौकी उभा केल्याने पोलिस व वनकर्मचारी यांची हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर करडी नजर राहणार आहे. माफक प्रवेश शुल्क मोजावे लागले तरी सुविधा उपलब्ध झाल्याने महिलांना धबधब्याचा आनंद घेता येणार आहे.