कोल्हापूर/सांगली : सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती असलेले ब्रह्मानंद पडळकर यांनी मिरजेत बसस्थानकाजवळ वादग्रस्त जागेचा कब्जा घेण्यासाठी दीडशे जणांचा जमाव सोबत घेऊन शनिवारी मध्यरात्री चार पोकलॅन लावून दहा दुकाने पाडून एक कोटी रुपयांचे नुकसान केले. याबाबत पडळकर यांच्यासह दीडशे जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पाडलेल्या दुकानांचे अवशेष हटविण्याचे काम दुसऱ्या दिवशीही सुरू होते. त्यावरुन, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या बंधुंचे कान टोचले. अजित पवारांनी उपहासात्मक टोला लगावला.
मिरजेत जेसीबीने घरे पाडून लोकांना बेघर केल्याप्रकरणी भाजपचे ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह त्यांचे बंधू आ. गोपीचंद पडळकरांनाही अटक करा, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी केली आहे. तर, आता अजित पवार यांनीही नाव न घेता टोला लगावला. राजकीय नेत्यांसह त्यांच्या नातेवाईकांचीही कानउघडणी केली. “काल एका आमदाराच्या भावाने मिरजेमध्ये काहीतरी घोळ करून ठेवला आहे. त्याने जेसीबी घेऊन काहीतरी केलं. त्याने नेमकं काय केलं? हे मला अजून नीट माहिती नाही. कारण मी पहाटेच इकडे आलो. संबंधित प्रकरणाची दुपारी माहिती घेणार आहे.”, असे पवार यांनी म्हटले.
तसेच, “पण आम्हीही एखाद्या पदावर बसतो, तेव्हा आमच्या जवळच्या नातेवाईकांनीही नीट वागलं पाहिजे. आम्हाला आमदारकी, खासदारकी किंवा विरोधी पक्षनेते पदं मिळाली म्हणजे आम्हाला शिंगं आलेली नसतात. आमच्याही लोकांनी जमिनीवर पाय ठेवून काम केलं पाहिजे. तेच सध्याच्या काळात होताना दिसत नाही. त्याचा विचार महाराष्ट्रातील जनतेनं केला पाहिजे,” अशा शब्दात अजित पवारांनी राजकीय नेतेमंडळींची कानउघडणी केली.
वादग्रस्त जागेबाबत तहसिलदार काय म्हणाले
सांगलीतील वादग्रस्त जागेबाबत मिरजेचे तहसीलदार दगडू कुंभार यांनी कलम १४५ प्रमाणे ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवून वादग्रस्त जागेत दोन्ही गटांनी काहीही करू नये, अशी नोटीस बजावली आहे. रविवारी सकाळी काही दुकानदार पाडलेल्या बांधकामाच्या दुरुस्तीच्या तयारीत असताना प्रशासनाच्या नोटिसीमुळे येथील नागरिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी नोटीस घेण्यास नकार दिल्याने जागेवर नोटीस चिटकावून व पोलिस वाहनांतून उद्घोषणा करून नोटीस बजावण्यात आली.