कोल्हापूर जिल्ह्यातील २४ बसस्थानकांचे रूपडे पालटणार, एसटीच्या दत्तक योजनेस सुरुवात
By सचिन भोसले | Published: July 4, 2023 01:49 PM2023-07-04T13:49:51+5:302023-07-04T13:50:11+5:30
उद्योगसमूहांना जाहिरात अन् विक्री करण्याची संधी
सचिन भोसले
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळ राज्यातील ५८० बसस्थानकांना स्वच्छ, सुंदर बनविणार आहे. त्याकरिता एसटी बसस्थानक दत्तक योजना जाहीर केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर विभागातील अ, ब आणि क वर्गातील एकूण २४ बसस्थानकांचे रूपडे पालटणार आहे. ही स्थानके लघु, मध्यम, मोठे उद्योजक, व्यापारी संस्था यांच्याकडे स्वारस्य अभिव्यक्ती सूचना मागविण्यात आल्या आहेत. या उद्योग संस्थांनी दत्तक घेऊन वर्षभर स्वखर्चाने विकसित देखभाल करावी लागणार आहे. त्या बदल्यात या उद्योगांना तेथे आपले उत्पादन किंवा सेवेची जाहिरात आणि विक्री करण्याची संधी दिली जाणार आहे.
राज्य शासनाने १ मेपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत राज्यातील ५८० बसस्थानकांचा समावेश होता. स्वच्छ बस, बसस्थानके, स्वच्छ आणि टापटीप स्वच्छतागृहे आणि परिसराचे सुशोभीकरण करणे ही या उद्योगांकडून महामंडळाला अपेक्षित आहे. त्याच्या बदल्यात उद्योगाला स्वउत्पादनाची जाहिरात आणि विक्रीही करता येणार आहे.
दत्तक घेणाऱ्या संस्थांना करावी लागणार आहेत ही कामे..
बसस्थानकाच्या मुख्य इमारतीची किरकोळ डागडुजी, विद्युत उपकरणांची दुरुस्ती करून विद्युत दिवे, पंखे सुव्यवस्थित करावे लागणार आहेत. रंगरंगोटी, प्रसाधनगृहांची किरकोळ दुरुस्ती करून स्वच्छ, नीटनेटके, निर्जंतुक दृष्टीने व्यवस्था करणे, प्रत्येक फलाटवर गावांचे मार्गदर्शक फलक, प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती फलक तयार करणे. दैनंदिन स्वच्छता, सुशोभीकरण, सौंदर्यीकरण करणे.
हे सहभागी होऊ शकत नाही
अमलीपदार्थ, तंबाखू, गुटखा, मद्य तत्सम पदार्थांचे उत्पादक, सेवा करणाऱ्या संस्था, कायद्याने जाहिरात करण्यासाठी प्रतिबंधित उत्पादने, समूहांना यात सहभागी होता येणार नाही.
या स्थानकांचे पालटणार रूप
‘अ’ वर्ग - कोल्हापूर, रेल्वे स्टेशन, गडहिंग्लज, गारगोटी, जयसिंगपूर, कागल, इचलकरंजी, वडगाव, रंकाळा, तर ब वर्गातील मुरगुड, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड, नृसिंहवाडी, हुपरी, हातकणंगले, संभाजीनगर, आजरा, राधानगरी आणि क वर्गातील कोडोली, वाठार, जोतिबा, शिरोळ, गगनबावडा या २४ बसस्थानकांचा समावेश आहे.
उत्कृष्ट प्रस्ताव आलेल्या उद्योग संस्थांना या २४ बसस्थानकांमध्ये वर्षभरासाठी संधी दिली जाणार आहे. इच्छुकांनी १५ दिवसांत आपले प्रस्ताव सादर करावेत. - अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, कोल्हापूर विभाग