लाचखोर कठरेसह तिघांच्याही मालमत्तेची चौकशी होणार, पोलिस कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 12:39 PM2023-07-07T12:39:05+5:302023-07-07T12:39:24+5:30

नियमबाह्य प्रकरणांचा संशय

The assets of the three along with the corrupt education co director Kathare will be investigated | लाचखोर कठरेसह तिघांच्याही मालमत्तेची चौकशी होणार, पोलिस कोठडीत रवानगी

लाचखोर कठरेसह तिघांच्याही मालमत्तेची चौकशी होणार, पोलिस कोठडीत रवानगी

googlenewsNext

कोल्हापूर : हॉटेल मॅनेजमेंट कोर्स सुरू करण्यासाठी कॉलेजमध्ये आवश्यक सुविधा असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तीन लाचखोरांची पोलिस कोठडीत रवानगी झाली. गुरुवारी (दि. ६) जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी तिघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. त्यांच्याकडील अपसंपदेचा शोध घेण्यासाठी उत्पन्नाचे मार्ग मालमत्तांची तपासणी होणार आहे.

शिक्षण सहसंचालक हेमंत नाना कठरे (वय ४६, सध्या रा. अंबाई डिफेन्स, कोल्हापूर, मूळ रा. पाचवड, ता. खटाव, जि. सातारा), स्टेनोग्राफर प्रवीण शिवाजी गुरव (वय ३२, सध्या रा. पीरवाडी, ता. करवीर, मूळ रा. महमंदापूर, ता. भुदरगड) आणि अनिल दिनकर जोंग (वय ३४, रा. राशिवडे, ता. राधानगरी) हे तिघे बुधवारी दुपारी शिक्षण सहसंचालक कार्यालयात लाच घेताना रंगेहाथ सापडले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांकडून तिन्ही संशयितांच्या घरांची झडती बुधवारी रात्री पूर्ण झाली. मात्र, त्यांच्या घरझडतीत पथकांच्या हाती विशेष माहिती लागली नाही.

शिक्षण सहसंचालक कार्यालयात रोजच लाचखोरीचे प्रकार होतात. महाविद्यालयांच्या विविध प्रकारच्या मंजुरी, प्राध्यापकांच्या तांत्रिक अडचणी, पगार पत्रकांची मंजुरी अशा अनेक कामांमध्ये या कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी हात ओले करून घेतात, अशा प्राध्यापक आणि शिक्षण संस्थांच्या तक्रारी आहेत. अटकेतील कठरे, गुरव आणि जोंग यांच्याकडे अपसंपदा असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे वेतनाच्या माध्यमातून मिळालेली रक्कम आणि त्यांच्याकडील मालमत्ता यांची तपासणी करणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सरदार नाळे यांनी सांगितले.

नियमबाह्य प्रकरणांचा संशय

कठरे हा यापूर्वीही शिक्षण सहसंचालक कार्यालयात कार्यरत होता. त्याच्या कार्यकाळात अनेक नियमबाह्य प्रकरणे नियमित झाल्याचा संशय आहे. याच्याविरोधात काही तक्रारी असल्यास तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपाधीक्षक नाळे यांनी केले आहे.

Web Title: The assets of the three along with the corrupt education co director Kathare will be investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.