... म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी दरेकरांच्या घरी जाऊन केलं कौतुक, तिरंग्यालाही दिली मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 05:03 PM2022-08-15T17:03:44+5:302022-08-15T17:03:57+5:30
देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'हर घर तिरंगा' मोहीम देशभरात राबविण्यात येत आहे.
कोल्हापूर : मागील 25 वर्षांपासून दरवर्षी स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताक दिनी आपल्या घरावर तिरंगा फडकवणाऱ्या कोल्हापूर येथील अजित दरेकर यांच्या घरी जावून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राष्ट्रध्वजाला वंदन केले. तसेच, या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांच्या देशभक्तीचे कौतुकही केले. दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी दरेकर घरासमोर तिरंगा फडकवतात, ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचंही ते म्हणाले.
देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'हर घर तिरंगा' मोहीम देशभरात राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने दरेकर कुटुंबीय राबवित असलेल्या या उपक्रमात आज संपूर्ण देशवासीय सहभागी झाले आहेत. या उपक्रमाची दखल घेऊन अमृत महोत्सवी वर्षात जिल्हा प्रशासनाच्यावतीने दरेकर यांच्या या उपक्रमावर आधारित बनवण्यात आलेल्या चित्रफितीला मिळालेला उत्फुर्द प्रतिसाद, ही देशभक्तीची भावना जागृत करणारा आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी रेखावार यांनी दरेकर कुटुंबीयांच्या उपक्रमाचा गौरव केला.
दरम्यान, आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकताना पाहण्यात खरा आनंद मिळत असल्याचे अजित दरेकर म्हणाले. यावेळी संगीतकार ऐश्वर्य मालगावे, अजित दरेकर व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.