कोल्हापूर : शंभर वर्षांहून अधिक काळ समता, बंधुता आणि पुरोगामी विचारांची कास जोपासणाऱ्या कोल्हापूरला जातीय दंगलीचा डाग लागला. हा डाग पुसण्यासाठी समस्त कोल्हापूरकरांनी रविवारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून समता, बंधुता आणि पुरोगामी विचारांची पावलं नव्याने उचलण्याचा निर्धार केला. ‘पुरोगामी प्रतिमा पुसण्यासाठी आणि जातीय दंगे घडविण्यासाठी कोल्हापूर शहर जातीयवाद्यांच्या निशाण्यावर आहे, आपण या प्रयत्नांना उधळून लावून एकीचे चित्र पुन्हा निर्माण करू या,’ असे आवाहन छत्रपती यांनी शिव-शाहू सद्भावना यात्रेला मार्गदर्शन व्यक्त केला.औरंगजेबाचे स्टेटस लावण्यावरून कोल्हापूर शहरात दि. ६ व दि. ७ जून रोजी जातीय दंगल उसळली होती. या दंगलीवेळी विशिष्ट समाजाच्या घरांची, दुकानांची, वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली होती. त्यामुळे जातीय सलोख्याला तडा गेला होता. ही बाब समस्त कोल्हापूरकरांच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे रविवारी हा सलोखा पुनर्स्थापित करण्यासाठी येथील पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी तसेच शाहू सलोखा मंचतर्फे सर्वपक्षीय शिव-शाहू सद्भावना यात्रेचे आयोजन केले होते.येथील नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारक स्थळापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत यात्रा काढण्यात आली. या यात्रेत शाहू छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयवंत आसगावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संजय घाटगे, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, सचिन चव्हाण, व्ही. बी. पाटील, वसंतराव मुळीक, भारती पोवार, सरलाताई पाटील, मेघा पानसरे, दिली पवार यांच्यासह कोल्हापूरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सद्भावना यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी नर्सरी बागेत छोटी सभा झाली. या सभेत अनेक मान्यवरांची भाषणे झाली. राजर्षी शाहू महाराजांनी समतेचा, पुरोगामित्वाचा पाया घातला. शिक्षणाची दारे सर्व जाती, धर्मांसाठी खुली केली. त्यामुळे देशभरात कोल्हापूरचा आदर्श सांगितला जातो. त्याच शहरात जातीय सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न होत आहे. अशा शक्तींना चोख उत्तर देण्यासाठी यापुढे आपणाला नव्याने लढाई सुरू करावी लागणार आहे. त्यासाठी कोल्हापूरकरांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे आवाहन सभेत करण्यात आले. यावेळी शहरात तसेच यात्रा मार्गावर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पुरोगामीत्वाची पावलं नव्याने उचलणार, कोल्हापूरकरांचा निर्धार; शिव-शाहू सद्भावना यात्रा उत्साहात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 12:23 PM