छत्रपती घराण्यातील दत्तक प्रकरण हा घरगुती वाद, प्रचाराचा मुद्दाच नाही; राजवर्धन कदमबांडे स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 12:48 PM2024-04-29T12:48:33+5:302024-04-29T12:49:15+5:30
कोल्हापूर : ‘मी भाजपचा एक कार्यकर्ता आहे, पक्षाच्या सूचनेनुसार मी येथे कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील महायुतीच्या प्रचारासाठी आलो आहे. ...
कोल्हापूर : ‘मी भाजपचा एक कार्यकर्ता आहे, पक्षाच्या सूचनेनुसार मी येथे कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील महायुतीच्या प्रचारासाठी आलो आहे. १९६२ मधील छत्रपती घराण्यात घडलेले दत्तक प्रकरण हा घरगुती वाद होता. तो या प्रचाराचा मुद्दा होत नाही. त्यामुळे याविषयी मी अधिक बोलणार नाही, अशा शब्दांत स्पष्टीकरण स्वर्गीय पद्माराजे यांचे पुत्र माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिले.
कोल्हापूरच्या गादीचे खरे वारसदार व खोटे वारसदार कोण हे जनताच ठरवेल. मला त्यावर काही भाष्य करायचे नाही. मी मात्र राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या रक्ताचा तसेच विचारांचा वारसदार आहे, असे कदमबांडे यांनी सांगितले.
शाहू छत्रपती संपत्तीचे वारसदार
महाआघाडीचे उमेदवार हे देखील छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे वारसदार आहेत, याकडे लक्ष वेधले असता कदमबांडे म्हणाले की, आत्ताचे शाहू छत्रपती हे छत्रपती शहाजी महाराज यांचे वारसदार असू शकतात, संपत्तीचे वारसदार असू शकतात; पण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार होऊ शकत नाही. त्यांना दत्तक घेताना कोल्हापुरात काय वाद झाला होता याबद्दल आपण जाणून आहात. त्यांना कोल्हापूर शहरात जागाही मिळाली नाही. तरीही हा वाद घरगुती आहे. त्याबद्दल मला अधिक बोलायचे नाही.
केवळ प्रचारासाठी आलोय
प्रचाराच्या निमित्ताने आपणास हा वाद चव्हाट्यावर आणण्यासाठी भाजपने पाठविले आहे का असे विचारले असता, दत्तक प्रकरण हा राजकीय प्रचाराचा विषय होऊ शकत नाही. मी भाजपचा कार्यकर्ता असल्याने पक्षाच्या आदेशाने एक कर्तव्य म्हणून येथे केवळ प्रचारासाठी आलो आहे. जुने वाद उकरून काढण्यासाठी नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.