नामदेवराव व्हटकर यांचा 'महापरिनिर्वाण' लवकरच झळकणार, डॉ. आंबेडकरांचा अखेरचा प्रवास पाहायला मिळणार

By संदीप आडनाईक | Published: December 6, 2024 01:20 PM2024-12-06T13:20:01+5:302024-12-06T13:24:40+5:30

घरदार विकून केले चित्रिकरण, कोल्हापुरातील नामवंत दिग्दर्शक

The movie 'Mahaparinirvana one story, two History' based on BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar last journey will be released soon | नामदेवराव व्हटकर यांचा 'महापरिनिर्वाण' लवकरच झळकणार, डॉ. आंबेडकरांचा अखेरचा प्रवास पाहायला मिळणार

नामदेवराव व्हटकर यांचा 'महापरिनिर्वाण' लवकरच झळकणार, डॉ. आंबेडकरांचा अखेरचा प्रवास पाहायला मिळणार

संदीप आडनाईक 

कोल्हापूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अखेरचा प्रवास कोल्हापूरचे कवी, लेखक, नाटककार आणि आमदार नामदेवराव लक्ष्मण व्हटकर यांनी चित्रित केला होता. त्यांनी या चित्रिकरणासाठी स्वत: चे घरदार, प्रेस विकून साडेतीन हजार फुटाचे चित्रिकरण करून ठेवले होते. पुढे ते सरकारकडे जमा केले. हा एकमेव ठेवा व्हटकर यांनी जतन करून ठेवला आहे. त्यांच्या जीवनावर आधारित 'महापरिनिर्वाण : एक कथा, दोन इतिहास' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. मात्र त्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

महामानवाने ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अखेरच्या दर्शनाकरिता आणि अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरिता प्रचंड जनसागर उसळला होता. त्यांचा हा अखेरचा प्रवास कोल्हापूरचे दिग्दर्शक नामदेवराव व्हटकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला होता. या दरम्यान कोणत्या विशेष घटना घडल्या, कोण कोण उपस्थित होते, अशा अनेक गोष्टी ज्या अनेकांना माहीत नाहीत, त्या या चित्रपटात पहायला मिळणार आहेत. हा मन सुन्न करणारा प्रसंग व्हटकर यांच्या नजरेतून पहायला मिळणार आहे, अशी माहिती त्यांच्या नात प्रा. नीलिमा शरद व्हटकर यांनी दिली.

हा चित्रपट डॉ. बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाणदिनी म्हणजेच ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित व्हावा, यासाठी प्रयत्न होता, परंतु त्याला अजून तीन महिने वेळ लागणार आहे. व्हटकर यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली आहे. शिवाय अंजली पाटील, कमलेश सावंत, गौरव मोरे हे कलाकारही झळकत आहेत. मात्र डॉ. आंबेडकर यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, अभिता फिल्म निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेंद्र बागडे असून, अमर कांबळे डीओपी आहेत. या चित्रपटाची पटकथा चेतक घेगडमल यांनी लिहिली आहे.

कोल्हापुरातील नामवंत दिग्दर्शक

नामदेव व्हटकर हे मराठीतील ज्येष्ठ कलाकार आणि दिग्दर्शक होते. सुलोचना अभिनित 'आहेर' हा १९५७ मधील चित्रपट, हंसा वाडकर अभिनित 'मुलगा' हा १९५६ मधील चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केले होते. राम गबाले यांच्या 'घरधनी' या पु. ल. देशपांडे यांच्यासोबतच्या १९५२ मधल्या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली होती.

Web Title: The movie 'Mahaparinirvana one story, two History' based on BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar last journey will be released soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.