Kolhapur: वाघजाईच्या डोंगरावर चिता रचून जाळल्याच्या घटनेचे गुढ उकललं, घातपात नव्हे तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 04:57 PM2023-10-23T16:57:28+5:302023-10-23T17:00:31+5:30
संशयाचा पडदा दूर झाला
प्रकाश पाटील
कोपार्डे : वाघजाई डोंगरावर गुरुवारी (दि.१८) रोजी सरण रचून अग्नी दिल्याचा प्रकार घडला होता. एका महिलेसह पाच अज्ञात व्यक्तींनी केलेल्या संशयास्पद प्रकारामुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. मात्र, या प्रकरणाचा संशय दूर झाला आहे. मंगळवार पेठ, कोल्हापूर येथील लाड चौकात राहणाऱ्या श्वान प्रेमी सुनीत शुक्ला यांचा कुत्र्याचे निधन झाले. त्याला आपल्या शेतात दहन केल्याचा खुलासा शुक्ला यांनी केला आहे. त्याचे व्हिडिओ दाखवल्याने या प्रकरणातील संशयाचा पडदा दूर झाला.
गुरुवारी चार पाच लोकांना वाघजाई डोंगरावर कळबेंचा दरा नावाने असलेल्या परिसरात दुपारी सरण रचून जाळल्याची चर्चा कळंबे, भामटे गावात दबक्या आवाजात होती. येथे काही तरी अघटित घडले असावे असा संशय व चर्चेला उधाण आले होते. काही प्रतिनिधींनी जागेवर जाऊन पाहणी केली. कळंबे, भामटे गावात याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच पन्हाळा पोलिसांनी चौकशीसाठी सातार्डे पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधला.
यानंतर शुक्ला यांनी आपल्या लाडक्या कुत्र्याचे निधन झाल्याचे सांगत कोल्हापूर येथे स्मशानभूमीत कुठे सोय झाली नसल्याने वाघजाई डोंगरावर आम्ही शेत घेवून तेथे अंत्यसंस्कार व विधी केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्याचे व्हिडिओही दाखवल्याने याप्रकरणातील संशयाचा पडदा दूर झाला.